प्रचारकी जीवनाच्या उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या कालखंडाची फलश्रुती काय? मोठ्या उमेदीने एका ध्येयवादाशी संपूर्ण तन्मय होण्याच्या ओढीतून संघ विचार आणि कार्याचा प्रसार करण्याचे स्वयंस्वीकृत व्रत घेऊन दक्षिणेत गेलो होतो, त्यासाठी व्यक्तिगत जीवन पूर्णपणे बाजूला सारले होते. आता त्याच व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनाच्या गरजेपोटी पुन्हा नागपूरात परतत आहोत… योग्य आहे ना हा निर्णय? आणि व्यक्तिगत जीवन सुरू करायचे म्हणजे तरी काय? लग्न, घर, संसार या रूढ मार्गावर वाटचाल सुरू करायची ? तीही आता वयाची चाळीशी पार केल्यानंतर? अशा अनेक प्रश्नांचे गाठोडे उराशी बाळगूनच दत्ताजी नागपुरात परत आले. प्रचारकी, ध्येयवादी जगण्याचे गारूड मोठे विलक्षण असते. व्यावहारिक पातळीवर अनेक अडचणी, हालअपेष्टा, उपेक्षा, कष्ट यांचीच मुख्यतः सोबत असली तरी मन प्रसन्न असते. उमेद, सृजनशक्ती यांना बहर आलेला असतो. ध्येयासक्तीची धुंदी परिस्थितीच्या सगळ्या खडतरपणाला हसतमुखाने सामोरे जाण्याचे बळ देत असते. मनाच्या एका कोपऱ्यात निरासक्ती आणि मानवसुलभ व्यक्तिगततेची आसक्ती यांच्यात द्वंद्व चालू असतेच. पण मनोनिग्रह निरासक्त जगण्यालाच झुकते माप देण्याचा असतो. अशा स्थितीत, कोणत्या ना कारणाने असेना, प्रचारकी कालावधी आणि अवस्थेला पूर्णविराम देऊन व्यक्तिजीवनात परतावे लागत आहे याबद्दलची काहीशी अपराधी भावनाही त्रास देत राहते. अशा संमिश्र मनःस्थितीतच दत्ताजी घरी परत आले असतील. प्रश्नांना, मनात निर्माण झालेल्या औदासीन्याला त्यांनी आपल्या सुहृद सहकाऱ्यांपाशी व्यक्तही केले असेल. सरसंघचालक गुरुजी, देवरस बंधू आणि अन्य सारे सहकारी अशा संवादासाठी उपलब्ध होतेच. अशा संवादातून मनाचे गुंते सहज उकलले जातात, परंतु ते हितगुज सार्वत्रिक चर्चेचा विषय कधीही बनवले जात नाहीत. अशी अत्यंत प्रगल्भ आणि हृदयंगम नातेसंबंधांची एक विलक्षण शैली संघ व्यवहारात विकसित झाली आहे. त्यामुळे दत्ताजींसारख्यांची अशी संवाद – चर्चा, त्यातून झालेला बोध इत्यादी विषयीचा अंदाज त्यांच्या व्यक्त झालेल्या व्यवहारातूनच घ्यावा लागतो. कधीतरी, प्रसंगाने अशा संवादातून जो भाव व्यक्त झाला त्याचा सूचक उल्लेख बोलण्यातून लिखाणातून होतो. नाही असे नाही; पण त्या उल्लेखांमध्येही गूढार्थच अधिक असतो. दत्ताजींच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी लिहिलेल्या त्यांच्याविषयीच्या लेखातून अशा गूढार्थाचे संकेत मिळतात. बाळासाहेब लिहितात :-
“… प्रचारक का जीवन समाप्त कर वे नागपूर वापस लौटे । सर्वसाधारण व्यक्ती की तरह यदि वह लौकिक जीवन अपनाना चाहते तो न तो उसमें कोई अडचन थी, और न ही कोई उसपर आपत्ती उठा सकता । किंतु दत्ताजी ने लौकिक संसार से मोडे हुए अपने मुँह को फिर संसार की ओर नही मोडा । प्रचारकी वृत्ती से ही उन्हों ने अपना व्यावहारिक जीवन शुरू किया । … यह सब करते हुए भी उन्होंने अपनी कौटुंबिक जिम्मदेरीयाँ भी भलीभाँती निभायी है । ज्येष्ठ बंधू के असामयिक निधन के पश्चात उनके कुटुंबियों को दुःख की खाई से बाहर निकालकर दत्ताजीने जो प्रतिष्ठा दिलाई हैं वह दत्ताजीकी अनेकानेक विशेषताओं में से एक विशेषता का परिचायक है।” नागपूरला परतत असताना मनात गर्दी करणाऱ्या प्रश्नांना कोणते उत्तर दत्ताजींनी शोधले याची कल्पना बाळासाहेब देवरस यांच्या या सूचक प्रतिपादनातून काही प्रमाणात येते. व्यक्तिगत जीवन सुरू करायचे, पण स्वत:चा संसार मांडायचा नाही – चरितार्थ व्यक्तिगत करायचा पण जगायचे मात्र लोकार्थासाठी असा समतोल साधण्याचा निश्चय करूनच जणू ते घरी परतले.
दत्ताजींच्या वडिलांचे १९५७ सालीच निधन झाले होते. सर्वात मोठे भाऊ विश्वनाथराव जबलपूर येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी करीत होते, तर आई आणि मधले भाऊ काशिनाथराव नागपूरला राहत होते. काशिनाथरावांची नोकरी पोस्ट खात्यातली. वडिलांनंतर तिघेही भाऊ राष्ट्रीय विचाराच्या चळचळीविषयी आस्था बाळगणारे होतेच. विश्वनाथरावही संघाच्या अगदी प्रारंभीच्या काळात २-३ वर्षे संघाचे प्रचारक होते. नंतरही हिंदू महासभेच्या कार्यात ते सक्रिय होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी निस्सीम आदर त्यांच्या मनात होता. काशीनाथराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच कामात सक्रिय होते. टपाल खात्यात त्यांच्यासोबत नोकरी करणाऱ्यांमध्ये अनंतराव हरकरे, वसंतराव हरकरे, हर्षे इत्यादी संघस्वयंसेवक होते. १९६३ मध्ये या सर्वांच्या नोकरीवर गदा आली. निमित्त संघकार्यात सहभागाचे! सरकारी नोकरी करणाऱ्यांनी संघाच्या कामात सहभागी होता कामा नये असा एक विचित्र नियम ब्रिटिश राजवटीपासूनच अस्तित्वात होता. सरकारी नोकरीत असलेले अनेक स्वयंसेवक त्या नियमाची तमा न बाळगता संघकाम करीत तसेच या नियमाची वास्तवातील निरर्थकता मनोमन जाणून असणारे सरकारी अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत. मात्र संघाबाबत आकस बाळगणारा एखादा अधिकारी त्या नियमाचा गैरफायदा घेत असे. संघस्वयंसेवकांना जाच करण्याची संधी या निमित्ताने साधत असल्याचीही उदाहरणे होती. अशाच एका उदाहरणाला काशिनाथरावांना सामोरे जावे लागले. पोस्टातले ते तिघे-चौघे संघस्वयंसेवक संघाच्या एका सहलीत सहभागी झाले. अन् तेवढ्यावरून त्या सर्वांना नोकरीतून निलंबित करण्यात आले. या निलंबनाला अर्थातच न्यायालयीन पातळीवर आक्षेप घेण्यात आले. नागपुरातले प्रख्यात वकील आबाजी सेनाड यांनी ही केस लढविली. ३-४ वर्षांनी केसचा निकाल लागला आणि सर्वांना मधल्या काळातल्या वेतनाच्या भरपाईसह पुन्हा नोकरीवर रुजू करून घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दत्ताजी परतले त्याच सुमारास पुतण्या विजय ( काशिनाथरावांचा चिरंजीव) दहावीची परीक्षा गुणवत्ता यादीत येऊन उत्तीर्ण झाला. दत्ताजींनी १५ किलो पेढे वाटून त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला. विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विजयची रिझर्व बँकेतील नोकरीसाठी निवडही झाली होती. दत्ताजीनी मात्र त्याला नोकरीत लगेचच न गुंतता शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा आग्रह धरला. विजयने पुढे नागपूरच्या विश्वेश्वरय्या इंजिनिअरींग कॉलेजमधून अभियंत्रिकीची पदवी प्राप्त केली आणि बंगलोरच्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्समध्ये उच्च शिक्षणही पूर्ण केलेशिक्षणाचाच मार्ग पुढे पत्करण्याविषयीचा निर्णय हा काकांच्या (दत्ताजींच्या) इच्छेचा आणि आग्रहाचाच परिणाम होता हे विजय आज कृतज्ञतेने नमूद करतो.
दत्ताजी नागपुरात परतल्याबरोबर लगेचच कौटुंबिक व्यवहारात जाणतेपणी लक्ष घालू लागले. नागपूरच्या मोहता विज्ञान महाविद्यालयात अध्यापक (डेमॉन्स्ट्रेटर) या नात्याने ते नोकरीत रुजू झाले. अर्थात ही नोकरी त्यांनी एक वर्षभरच केली. पुढच्याही वर्षी ती नोकरी सुरू राहिली असती. परंतु त्यांना पूर्णवेळ प्राध्यापक या नात्याने काम करण्यात रुची होती आणि महाविद्यालयाने त्यांना डेमॉन्स्ट्रेटर (प्रयोगशाळा पर्यवेक्षक) पद देऊ केले होते. त्यांनी ते विचारपूर्वक नाकारले. ते स्वतः उत्तम शिक्षक होण्याची क्षमता बाळगून होते. त्यामुळे त्यांनी मार्ग पत्करला तो विज्ञानाचे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा. १९६५ च्या काळात कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा विचार धाडसीच म्हटला
पाहिजे. कारण त्या काळात आजच्या सारखे कोचिंग क्लासेसचे पेव फुटलेले नव्हते. एवढेच नव्हे तर, स्वतंत्र कोचिंग क्लास वा खाजगी शिकवणीला जाणे कमीपणाचे लक्षण समजले जात असे. अभ्यासक्रमिक शिक्षणासाठी खाजगी शिकवणीची जोड देणे ज्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक वाटे ते विद्यार्थी अभ्यासात कच्चे आहेत असे समीकरणच त्या दिवसात रूढ होते. तरीही दत्ताजी आपल्या आणि कुटुंबाच्या चरितार्थाचे प्रमुख माध्यम या नात्याने कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा विचार करीत होते. या शिकवणी वर्गाचे विशिष्ट स्वरूप त्यांच्या कल्पनेत होते. याच स्वरूपाची अभ्यास व्याख्यानमाला त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या वतीने पूर्वी आयोजित केलीच होती. नागपुरातल्या सगळ्या महाविद्यालयांमधील उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची व्याख्याने सर्व विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावीत याची व्यवस्था त्यांनी चौसष्ट व्याख्यानांच्या त्या व्याख्यानमालेत केली होती. तेच सूत्र त्यांनी आपल्या ट्युटोरियल क्लासेससाठी डोळ्यांसमोर ठेवले होते. एक एक करीत सगळ्या विषयांचे नागपुरातले सर्वोत्कृष्ट शिक्षक-प्राध्यापक त्यांनी आपल्या ट्युटोरियल क्लासेसशी जोडले. अल्पावधीत त्यांचे क्लासेस लोकप्रिय झाले.
दत्ताजींच्या नागपुरातील आगमनाबरोबरच आणखी एक योग जुळून आला होता. १९६४ च्या नोव्हेंबर महिन्यात नागपुरातच अभविपचे बारावे अखिल भारतीय अधिवेशन झाले. दत्ताजींचे स्वाभाविकच नागपुरबरोबरच विद्यार्थी परिषदेतही पुनरागमन या अधिवेशनानिमित्त ‘झाले. नुसतेच पुनरागमन नव्हे तर, परिषदेच्या महाराष्ट्रातल्या संघटनेची प्रारंभिक जडणघडण या काळात आकाराला येऊ लागली होती. अखिल भारतीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत प्राध्यापक-शिक्षक वर्गाचा प्रमुख सहभाग संघटनेत रहावा, त्यायोगे कामाच्या स्थैर्याची व्यवस्था निर्माण व्हावी, तसेच हौसे-मौजेच्या पलीकडे संघटनेला पोचविणारी वैचारिक बैठक सिद्ध व्हावी या दिशेने परिषद वाटचाल करू लागली होती.
दत्ताजींसमोरचे विद्यार्थी – विश्व विशाल होते. जयंत ट्युटोरियल्सचे त्यांनीच साकार केलेले चरितार्थ साधन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जणू आधुनिक गुरुकुलच सर्व विद्याशाखांमध्ये विविध महाविद्यालयांत शिकणारे, सगळ्या सामाजिक स्तरातले, भौगोलिकदृष्ट्या विदर्भाचा सर्व शहरी आणि ग्रामीण भाग व्यापणारे, विभिन्न पार्श्वभूमीचे आणि आर्थिक गटातले विद्यार्थी जयंत ट्युटोरियल्समधून ज्ञानसंपन्न झाले. दत्ताजींच्या रूपाने त्यातल्या अनेकांना एक आत्मीय पालक, हितकर्ता मार्गदर्शक आणि प्रकाशाचा वाटाड्या लाभला. अभ्यासक्रमिक शिक्षणाविषयीचे सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि साहाय्य तर त्यांना दत्ताजींकडून मिळालेच; त्याशिवाय त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या स्थैर्याची आणि उन्नतीची चिंता वाहणारा एक ज्येष्ठ आधारही लाभला. वेगवेगळ्या कारणांनी चाचपडणारे अनेकजण त्यांच्या सहवासात आणि स्पर्शाने ठामपणे उभे राहू शकले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे दत्ताजीनी साकार आणि समृद्ध केलेले प्रांगणही अर्थातच महाविद्यालयीन विद्यार्थ्यानीच फुललेले. या संघटनेच्या अंगभूत विद्यार्थी केंद्री | स्वरूपामुळे दत्ताजी त्यात रमले की दत्ताजींच्याच सहभागामुळे संघटनेचे विद्यार्थी – केंद्री स्वरूप समृद्ध झाले या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. महाविद्यालयीन वयोगटाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समूह परिपक्वता आणि उच्छृंखलता यांच्यामधील सीमारेषेवर झुलत असतो. एकीकडे जोष, उत्साह, धुंदी, इर्ष्या, आकांक्षा या वयाला भुरळ घालत असतात. तर दुसरीकडे जाणीव – समज – आकलन आणि माहिती यांच्या बाबतीत प्रगल्भतेचा विशिष्ट टप्पाही या वयाने गाठलेला असतो. या दोन्हींमध्ये समतोल साधणाऱ्या विवेकाची जोड तरुण वयीन विद्यार्थीवर्गाच्या मानसिकतेला प्राप्त करून देणारे अजब कसब दत्ताजींच्या अंगी होते. विद्यार्थी परिषदेच्या कार्यशैलीत आणि कार्यकर्ता विकासाच्या प्रक्रियेत दत्ताजींनी हे कौशल्य पुरेपूर वापरले.
१९५०-५१ च्या (परिषदेच्या) बाल्यकाळापासूनच त्यांनी विद्यार्थ्यांचा, कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन विशाल बनविणारे कार्यक्रम योजले, यशस्वी केले आणि त्यात विद्यार्थी- विद्यार्थीनींची शक्ती संयोजित केली. पूरग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी साहाय्याचे उपक्रम, सेवावृत्ती, श्रमानुभव यांचा संस्कार देणारे कार्यक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी, संस्कारक्षम कलाकृतींचा आस्वाद घेण्याची दृष्टी… अशा विविधांगी उपक्रमांची मालिका त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या घडत्या काळातच आयोजित केली. या योगे परिषदेच्या वाटचालीची आणि प्राधान्यक्रमाची दिशा स्पष्ट करणारा मार्ग त्यांनी संघटनेच्या बाल्यकाळातच प्रशस्त केला. केवळ एक तात्कालिक मंच वा मंडळ किंवा तरुण विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या हौसे- मौजेला वाव देणारी संस्था नव्हे तर सुसंस्कारित छात्रशक्ती निर्माण करणारी आणि त्या शक्तीचे राष्ट्रकार्यात संयोजन करणारी, दीर्घकालीन व्यापक उद्दिष्टाकडे प्रवास करणारी एक ( Genuine student Movement) । असे समर्पक स्वरूप परिषदेला प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेत अग्रभागी राहिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी दत्ताजी एक प्रमुख राहिले. परिषदेच्या संदर्भात एक विशेष बाब मुद्दाम नमूद केली पाहिजे. ही विद्यार्थ्यांची संघटना. त्यामुळे संघटनेचे सदस्य आणि कार्यकर्ते यातील नव्वद टक्क्यांहून अधिक संख्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीसमूहाची. त्यामुळे स्वाभाविकच हा समूह दर चार-पाच वर्षांनी बदलणारा. पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन विद्यार्थी विद्यापीठाच्या कक्षेबाहेर गेला की हळूहळू कार्यकर्ता समूहातूनही बाहेर पडणे स्वाभाविक. त्याची जागा मागून येणारे कार्यकर्ते घेतात. या पार्श्वभूमीवर ध्येय धोरणे आणि कार्य सातत्याच्या दृष्टीने स्थिर घटकाची आवश्यकता असते. शिक्षण संपल्यानंतर काही वर्षे पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रूपाने ही गरज काही अंशी भागविली जाते, तर बऱ्याच अंशी ती अध्यापक-प्राध्यापक यासारख्या समूहाच्या सहभागानेच पूर्ण होते. त्याचबरोबर परिषदेच्या कार्यकक्षेतून कालक्रमाने बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यानेही या ना त्या स्वरूपाच्या सामाजिक कामात सहभागी राहून परिषदेत प्राप्त केलेल्या संस्कार आणि दृष्टिकोनाचा निर्वाह करीत रहावा ही सुद्धा अपेक्षा असतेच. त्याही बाबतीत परिषदेतील ‘स्थिर घटक’ महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दत्ताजी दीर्घकाळपर्यंत ही स्थिर घटकाची भूमिका सहजपणाने निभावत राहिले. मनाची प्रफुल्लित स्थिती आणि व्यवहारातील ताजेपणा यांच्या बळावर ते सर्व कार्यकर्त्याना सदैव प्रेरणा देत राहिले.
मध्यवर्ती कार्यकर्तासमूह महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा- त्यामुळे शिक्षण घेत असतानाच्या ४-५ वर्षांच्या काळापुरताच तो समूह संघटनेत सक्रिय राहील हे अपरिहार्य होते. परिषदेच्या आता रूढ झालेल्या परिभाषेत या स्थितीचे वर्णन Floating Population या शब्दात करण्यात येते. अशा Floating, सतत बदलत्या समूहासह संघटनेच्या विचार-व्यवहार-कार्यात सातत्य रहायचे असेल तर स्थिर घटक या नात्याने प्राध्यापक वर्गाचे स्थान महत्त्वाचे. तारुण्याचा समर्पणोत्सुक जोष आणि थोड्याशाच मोठ्या वयोगटातील प्राध्यापकांची अनुभवजन्य परिपक्वता यांचा समतोल परिषदेत साधला जातो. एका बाजूने कामाच्या सातत्यपूर्ण विकासाची तर दुसऱ्या बाजूने एक जबाबदार संघटना अशी प्रतिमा आणि चरित्र संघटनेला प्राप्त होण्याची व्यवस्था या समतोलातून साकार होत गेली आहे. या प्रक्रियेतील, देशभरातल्या मोजक्या प्राध्यापक कार्यकर्त्यांच्या यादीत दत्ताजींचे स्थान प्रमुख होते. अध्यक्षपद ही त्यातील तांत्रिकता पूर्ण करणारी बाब होती इतकेच. १९६४-६५ हे एक वर्ष आणि पुढे १९७० ते १९७३ ही तीन वर्षे दत्ताजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले. मोहता सायन्स कॉलेजमधील एक वर्षाचे अध्यापन कार्य अन् त्यापेक्षाही पुढे दीर्घकाळ जयंत ट्युटोरियल्स या ख्यातिप्राप्त कोचिंग क्लासेसचे संचालक या नात्याने दत्ताजींचा शैक्षणिक क्षेत्रातील कर्तबगार सहभाग पुढच्या १५-२० वर्षांमध्ये फुलत गेला. १९६४ पासून पुढे वीस वर्षांहन अधिक काल दत्ताजींसोबत संघाच्या आणि विद्यार्थी
परिषदेच्या कामात सक्रिय राहिलेले गोविंद हडप यांच्या शब्दात सांगायचे तर दत्ताजींचा। स्पर्श म्हणजे ‘परीसस्पर्श’च होता. ‘दत्ताजींची ‘माणूस’ या बाबतीतली आस्था आणि संघटनशैली ही थेट स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीशीच नाते सांगणारी होती’, अशा उत्कट शब्दात हडप आपली प्रतिक्रिया नोंदवितात. “संघ वा परिषदकार्य नेमके कशासाठी याचे गमक दत्ताजी फार समर्पक शब्दात वर्णन करीत असत. शाखा केवळ व्यायामासाठी वा खेळासाठी नाही तर, समाजात पारिवारिक भावना रुजविण्यासाठी. प्रत्येक समाजबांधवाविषयी आपलेपणाची भ्रातृभावना निर्माण करणारे केंद्र म्हणजे शाखा… त्या दृष्टीने परस्परांच्या सुख-दुःखाशी समरस होण्याची वृत्ती बाळगून संघटनेचे काम प्रसारित केले पाहिजे असे ते सांगत. आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या नित्य व्यवहारातून ते या वृत्तीचे दर्शन कार्यकर्त्यांना घडवीत. त्यामुळेच त्यांच्या सहवासातून या संस्काराचा खोलवरचा ठसा असंख्य कार्यकर्त्यांच्या मनावर उमटला आहे…”
गोविंदराव हडप पुढे प्राध्यापक- प्राचार्यही झाले. त्या पदांवरून काम करतानाही दत्ताजींनी दिलेल्या या संस्कारांचा खूपच उपयोग झाला असे ते नमूद करतात.
‘…कॉपीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या गोंदियातील एका कॉलेजमध्ये मी विद्यापीठातर्फे परीक्षा निरीक्षक या नात्याने गेलो असता एका विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले आणि कॉपीसहित त्याची उत्तरपत्रिका विद्यापीठात पाठवून दिली. कॉलेजच्या व्यवस्थापक मंडळातील एका पदाधिकाऱ्याशी सदर विद्यार्थ्याचे नावे असल्याने त्याच्यावरील कारवाईबाबत माझ्यावर बरेच दडपण येत होते. ‘शिस्तपालन समिती’चे अध्यक्ष या नात्याने हे प्रकरण दत्ताजींसमोर गेले. त्यांनी आम्हा दोघानाही बोलावून घेतले. एकूण प्रकरण दत्ताजींनी अतिशय विलक्षण पद्धतीने हाताळले. विद्यार्थ्याच्या अपराधावर पांघरूण घालण्याची भूमिका तर घेतली नाहीच, उलट त्या विद्यार्थ्यालाच म्हणाले ‘अरे तुझ्यामध्ये जबरदस्त शक्ती आहे, त्या शक्तीचा योग्य वापर करून परीक्षा उत्तीर्ण होण्याऐवजी कॉपीसारखा गैरमार्ग अवलंबून उत्तीर्ण होणे यात काही पुरुषार्थ आहे काय?…’ १९८३ साली त्या विद्यार्थ्याला तीन वर्षांसाठी परीक्षा देण्यास अपात्र ठरविले गेले. तीन वर्षांनी – १९८६ मध्ये योगायोगाने त्याच महाविद्यालयात परत गेलो तेव्हा तोच विद्यार्थी मला आपणहून येऊन भेटला. अपात्रतेची तीन वर्षे उलटल्यावर त्याने परीक्षा दिली आणि प्रथम वर्गात बी.कॉम. ही पदवी संपादन केली. दत्ताजींबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत तो म्हणाला, ‘तेव्हा माझ्यातील पुरुषार्थाला दत्ताजींनी जागविले त्यामुळेच आज मी माझ्या यशाबद्दल अभिमान बाळगू शकतो आहे…!’ स्वामी विवेकानंद म्हणत ‘Ours is to put the chemicals together, crystallisation will follow by Nature.’ दत्ताजींनी स्वामीजींचे हे शब्द तंतोतंत आपल्या व्यवहारात उतरविले होते…!”
१९६५-६६ च्या शैक्षणिक वर्षापासून ‘जयंत ट्युटोरियल्स’ चा प्रयोग सुरू झाला. विविध अर्थांनी हा प्रयोग अभिनव होता. तोपर्यंत ‘क्लासेस’ या संकल्पनेच्या रूढ असलेल्या स्वरूपाला कलाटणी देत जयंत ट्युटोरियल्सची वाटचाल सुरू झाली. स्वतः दत्ताजी पदार्थ विज्ञान शास्त्राचे शिक्षक. क्लासेसची सुरुवात झाली तीही विज्ञान शाखेपुरती. आपल्या या क्लासेसना ‘जयंत ट्युटोरियल्स’ हे नाव दत्ताजीनी का दिले? त्यांच्या परिवारात वा स्नेही-आप्तजनात जयंत नावाचे कोणीच नव्हते. तरीही ते नाव त्यांना का निवडावेसे वाटले याची संगती लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांना एकच अगदी अस्पष्टसे उत्तर मिळते. ‘विजयंता’ हा पहिला भारतीय बनावटीचा रणगाडा भारतीय लष्करात त्याच वर्षी, १९६५ मध्येच, दाखल झाला होता.
१९६३ मध्ये या रणगाड्याचे पहिले प्रायोगिक उत्पादन (प्रोटोटाईप) करण्यात आले आणि १९६५ मध्ये हे अस्सल भारतीय बनावटीचे रणगाडे लष्करात समाविष्ट केले गेले. ‘जयंत’ या नावाची निवड करण्यामागे दत्ताजींच्या मनात या घटनेविषयीचा अभिमान तर महत्त्वाचा ठरला नसेल? त्यांची एकूण मनोरचना, आणि चित्तवृत्ती लक्षात घेता हा अंदाज तर्कसंगत वाटतो. तो तंतोतंत खरा असेलच असे नाही. परंतु क्लासेस सुरू करण्याचा त्यांचा निर्णय निव्वळ व्यवसाय करून पैसा मिळवण्यापुरता मर्यादित नव्हता हे निश्चित. किंबहुना त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि टाकलेले प्रत्येक पाऊल यांना नीतिमूल्यांविषयीची कमालीची आस्था आणि समाजहिताविषयीची अस्सल काळजी यांचीच पार्श्वभूमी असे. त्यांच्या जपणुकीच्या मापदंडावरच त्यांचा प्रत्येक निर्णय बेतलेला असे. त्यांच्यासोबत ‘शिक्षक मंच’ या संघटनेचे काम केलेले आणि शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडूनही गेलेले (माजी आमदार वसंतराव काणे यांच्याशी त्यांचा वेळोवेळी झालेला संवाद या गोष्टीची चुणूक दाखवून देतो.
योगायोग असा की वसंतराव धरमपेठ विद्यालयाचे प्राचार्य होते आणि जयंत ट्युटोरियल्सच्या सुरुवातीच्या काळातील काही वर्षे धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयाची प्रयोगशाळा क्लासेससाठीही अधिकृतपणे उपयोगात आणली जात असे. त्यामुळे दत्ताजींशी त्यांचा नियमित संपर्क असे. जयंत ट्युटोरियल्सचे स्वरूप आणि यश याबद्दलच्या कुतुहलापोटी त्यांनी एकदा दत्ताजींना विचारले, “क्लासेसच्या रूपातही तुम्ही शिक्षणाचा दर्जा उत्तम कसा राखू शकता?” दत्ताजी म्हणाले, “नागपूरात शिकायला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तमातले उत्तम शिक्षण उपलब्ध व्हायला हवे हाच तर माझा क्लासेस सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकवणारे सगळ्या विषयांचे सर्वात उत्कृष्ट प्राध्यापक क्लासेसमध्ये शिकवण्यासाठी यावेत असा प्रयत्न असतो. त्या सर्व प्राध्यापकांना त्यांच्या योग्यतेनुसार उत्तम मानधन दिले जाईल असे आम्ही पाहतो. तसेच विद्यार्थ्यांनाही सहज परवडेल असे माफक शुल्क आकारतो…’ याच संवादात सहजपणे दत्ताजी बोलून गेले – ‘तथाकथित स्पर्धक आणि व्यावसायिक क्लासेसची दुकाने मी सहज बंद पाडू शकतो… पण अशा तद्दन बाजारू व्यावसायिकतेच्या उद्देशाने मी हे क्लासेस सुरूच केलेले नाहीत, त्यामुळे मला ते करायचे नाही…!” धरमपेठ महाविद्यालय आणि दत्ताजी यांच्यातील नातेसंबंधांचे एक अनोखे वैशिष्ट्य नमूद केले पाहिजे. या महाविद्यालयाची संस्था सुरुवातीपासूनच संघाच्या स्वयंसेवकांनीच चालविली. दत्ताजींचे संघातील स्थान अत्यंत आदराचे. तरीही त्याचा लाभ घेऊन दत्ताजीनी धरमपेठ महाविद्यालयावर अधिकार गाजविला नाही. क्लासेससाठी संध्याकाळच्या वेळी कॉलेजची जागा तसेच प्रयोगशाळा वापरण्याची अनुमती संस्थेकडून मागताना त्यांचा आविर्भाव नम्रतेचा असे. व्यावहारिक स्तरावरही योग्य तो व्यवहार कसोशीने जपला जाईल याचीही काळजी ते घेत. महाविद्यालयाच्या सगळ्या वर्गखोल्यांमध्ये दत्ताजींनी आपल्या खर्चाने पंखे बसवून घेतले. पुढे नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीतले एक प्रमुख सदस्य या नात्याने महाविद्यालयाचे प्राचार्य विविध कामांसाठी दत्ताजींना भेटत. परंतु त्याही वेळी क्लासेस संबंधीच्या संस्था-व्यवहारात त्यांनी औचित्यपूर्ण समतोल साधलाच.
जयंत ट्युटोरियल क्लासेस (जेटीसी) सुरू करून चालविण्यामागे असलेल्या उद्देशाचे आणि त्यातील औचित्याचे तंतोतंत पालन पुढची २५ वर्षे अखंडितपणे सुरू होते. जेटीसी हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग म्हणून नावारूपाला आला तो यामुळेच. एकतर या आधीच नमूद केल्यानुसार महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा उपयोग करण्याची अधिकृत व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले हे बहुधा एकमेव क्लासेस असावेत. दुसरे म्हणजे माफक शुल्क व उत्तम शिक्षक-प्राध्यापकांकडून मिळणारे मार्गदर्शन आणि तिसरे म्हणजे ग्रामीण परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबर अन्यही सगळ्या, अगदी राहण्या- जेवण्याच्या व्यवस्थेसकट-आवश्यक बाबींमध्ये मिळणारा आत्मीयतापूर्ण सहयोग. तरुण विद्यार्थ्यांविषयी दत्ताजींच्या ठायी असलेल्या आस्थेचा व्यवहार ही एक स्वतंत्रपणे दखल घेण्याजोगी बाब आहे. या सर्वांमुळे अतिशय अल्पावधीतच जेटीसीचे वर्ग भरघोस विद्यार्थी संख्येने ओसंडून जाऊ लागलेविज्ञान शाखेच्या पाठोपाठ वाणिज्य शाखेच्या विषयांचेही क्लासेस जेटीसीत सुरू झाले.
नागपुरात परतल्यावर काही वर्षे तिघेही डिडोळकर बंधू चिटणीसपुरा-महाल येथील घरातच राहत होते. पुढे ज्येष्ठ बंधू विश्वनाथराव यांनी अभ्यंकर नगरात तर दुसरे भाऊ काशिनाथराव यांनी रेशीमबाग भागात घरे बांधली. दत्ताजी अभ्यंकरनगर येथे मोठ्या भावाबरोबर राहू लागले.
जयंत ट्युटोरियल्सच्या ४-५ वर्षातच एकाच्या दोन शाखा झाल्या. एक शाखा महालात तर दुसरी धरमपेठ येथे. विद्यार्थी संख्या ५०० च्या पुढे गेली होती. दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची व्यवस्था त्यांनी चोख आणि व्यावसायिक पद्धतीने बसविली होती. एका पूर्ण शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थ्यांकडून १४० रु. शुल्क घेतले जात असे. हे शुल्क एकूण तीन मासिक हप्त्यांमध्ये देण्याची विद्यार्थ्यांना मुभा होती. खरोखरच गरजू असणाऱ्या विद्यार्थ्याला शुल्कामध्ये सवलत दिली जाई. कधी कधी तर शुल्क पूर्णपणे माफही केले जात असे. पण तशी लेखी सूचना कार्यालयीन नोंदीसाठी दत्ताजी स्वतः दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांकडे देत. महाल शाखेची व्यवस्थापकीय आणि कार्यालयीन जबाबदारी अनंतराव मुळे हे त्यांचे सहकारी सांभाळत. तर धरमपेठ शाखेची व्यवस्था तंबाखे नावाचे सहकारी पाहात. या क्लासेसमध्ये विद्यार्थी या नात्याने प्रवेश घेतलेले सुनील पाळधीकर (सध्या नागपुरातील अग्रगण्य वकील आहेत) पुढे कितीतरी वर्षे जेटीसीची संपूर्ण व्यवस्था अत्यंत विश्वासाने आणि समर्थपणे सांभाळत होते. दत्ताजींच्या विस्तृत मित्रपरिवारात तर सुनील पाळधीकर यांना दत्ताजींचे मानसपुत्रच म्हटले जात असे. अन् स्वतः सुनील पाळधीकरही दत्ताजींबाबतची कृतज्ञता मोठ्या अभिमानाने सतत उराशी बाळगून आहेत.
१९७१ पासून दहा वर्षे पाळधीकर ‘केदार’ या दत्ताजींच्या निवासस्थानीच राहात होते. ‘केदार’ हे धरमपेठ शिवाजीनगर भागात सिमेंट रोडवरील घर दत्ताजींनी १९७१ साली प्लॉट विकत घेऊन बांधले. सुमारे दीड लाख रूपये खर्चून खरेदी केलेल्या या प्लॉटवर विद्यार्थी वसतिगृह बांधण्याची मूळ कल्पना दत्ताजींच्या योजनेत होती. नागपूरच्या परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या अडचणी सतत त्यांच्या समोर येत. त्या लक्षात घेऊन एक वसतीगृह आपण सुरू करावे अशी इच्छा त्यांच्या मनात होती. मात्र त्या आधीच, १९७०च्या तीन नोव्हेंबर रोजी काशिनाथरावांचे अकल्पित निधन झाले. काशिनाथरावांची मुले शिक्षण घेत होती. विजय, अशोक, रवी ही तीन मुले आणि सगळ्यात लहान विद्या ही एक मुलगी. काशिनाथरावांच्या निधनापाठोपाठ महिन्याच्या आतच आई गंगूबाईही निवर्तल्या. पाठोपाठच्या या दोन आघातांनी डिडोळकर परिवार हादरून गेला. दत्ताजींच्या योजनेचे सगळे संदर्भ आता बदलून गेले. तोपर्यंत ते वडील बंधू विश्वनाथ यांच्याकडेच अभ्यंकर नगरात राहत होते. काशिनाथराव आणि आई गंगूबाई यांच्या पाठोपाठ झालेल्या निधनानंतर काशिनाथ डिडोळकर यांचा परिवार काहीसा एकाकी झाला. त्यामुळे दत्ताजी रोज केशवनगरमधील त्यांच्या घरी रात्री मुक्कामाला जाऊ लागले… सगळा परिवार अभ्यंकर नगरातील घरी तर घर बंद राहू नये म्हणून दत्ताजी आणि त्यांचा दुसरा पुतण्या अशोक मुक्कामापुरते केशवनगरच्या घरी अशी व्यवस्था काही दिवस त्यांनी चालविली. मोठा पुतण्या विजयचे अभियांत्रिकीचे शिक्षण चालू होते. तोही शनिवार- रविवारी केशवनगरमध्ये येई. या काळात उषावहिनी आणि त्यांची तिन्ही मुले यांच्याशी दत्ताजींचा जिव्हाळा अधिक घनिष्ट झाला. किशोरवयीन पुतण्याना त्यांनी वडिलांची उणीव भासू दिली नाही.
धरमपेठेत घरच बांधायचा निर्णय दत्ताजींनी केला. काशिनाथरावांच्या परिवारासोबत राहण्याचा आणि त्या सर्वांच्या पाठीशी उभे राहाण्याचा विचारही त्यांनी केला. मोठा मुलगा विजय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. १९७४ मध्ये त्याने बी.ई.च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. त्यानंतरच्या सुटीत दत्ताजी सर्वांना घेऊन उत्तर भारतात बद्रीनाथ, केदारनाथच्या यात्रेला गेले. सौसर येथील डॉ. शेखर देवपुजारी आणि नागपूर येथील डॉ. देवधर या दोघांचे कुटुंबीय आणि डिडोळकर परिवार असे सर्वजण, एकूण पंचवीस जण, तीन वाहने करून एक महिन्याच्या पर्यटनाला गेले. गंगोत्री, जमनोत्रीची तीर्थस्थाने त्यांनी या यात्रेत पाहिली. यात्रेहून परतल्यानंतर धरमपेठेतल्या नव्या घराला ‘केदार’ हेच नाव दिले. पुढच्या काळात ‘केदार’ हा जणू आधुनिक काळातला मठच बनला. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, जेटीसीतील विद्यार्थी-शिक्षक, शहरातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक … ‘केदारहा परवलीचा शब्दच बनून गेला. तळमजल्यावर डिडोळकर परिवार राहत होता तर वरचा मजला हे अनेकांचे माहेरघरच बनले.
दत्ताजींनी स्वतः विवाह केला नाही परंतु प्रपंचाची सारी कर्तव्ये आणि कुटुंब वत्सलतेचा सारा व्यवहार अत्यंत कसोशीने सांभाळला. पुतण्यांच्या शिक्षणात तर त्यांनी जाणतेपणाने घातलेच; पण मोठ्या विजयचे लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचे शिक्षण, नोकरी याचीही काळजी घेतली. नागपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश पांडे यांच्या विशाल आणि संपन्न परिवारातील ११ अपत्यांपैकी सर्वात धाकटी कन्या आशा. १७ खोल्यांच्या विस्तीर्ण घरातून आशा १९८० साली विवाह होऊन डिडोळकरांच्या छोट्या घरात आली. लग्न झाल्यानंतर तिने बी.एड. पूर्ण केले. पुढे पी. एच. डी. साठी संशोधन केले. तिच्या या साऱ्या शैक्षणिक वाटचालीत दत्ताजींचे प्रोत्साहन होतेच, पुढे एल.ए.डी. कॉलेजमध्ये तिने प्राध्यापक पदासाठी अर्ज केला. तेव्हा दत्ताजींनी त्यात व्यक्तिगत लक्ष घातले. विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे (एक्झिक्युटिव कौन्सिल) सदस्य या नात्याने ते प्राचार्या रजनी राय (त्याही कौन्सिलच्या सदस्या होत्या) यांच्याशी बोलले. रागिणी डिडोळकर यांची पात्रता प्राध्यापक पदाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे त्यामुळे अन्य कोणत्याही अडचणी आड येऊ न देता त्यांच्या अर्जाचा विचार करावा असे त्यांनी रजनी राय यांना सांगितले. दत्ताजींचा शब्द खाली पडू देणे शक्यच नव्हते. त्यामुळे निव्वळ पात्रतेच्या निकषावर रागिणी डिडोळकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्या आजही एल.ए.डी. कॉलेजमध्ये यशस्वी प्राध्यापिका आहेत.
‘२६, केदार, सिमेंट रोड, शिवाजीनगर, नागपूर’ या पत्त्याचे नागपुरातल्या अनेक व्यक्तींच्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे. शिक्षणासाठी नागपुरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले मुक्कामाचे ठिकाण केदार असे. आजारी असलेल्या, शुश्रूषेची गरज असलेल्या, एखादी शस्त्रक्रिया झालेल्या संघप्रचारकांचा मुक्काम केदारवर राही. परिषदेच्या बैठकी केदारवर होत. कार्यकर्ते आपली व्यक्तिगत सुखदुःखे, वेदना घेऊन केदारवरच येत. त्यांच्या मनातले गुंते दत्ताजींशी होणाऱ्या संवादातून हलकेच मोकळे होत. विद्यार्थी परिषदेचा पूर्वांचल क्षेत्राच्या संबंधातील ‘आंतरराज्य छात्र जीवन दर्शन’ हा प्रकल्प सुरू झाला, त्याच्या अंतर्गत अरुणाचल प्रदेशातून आलेले दोन विद्यार्थी नागपुरात केदारवरच काही काळ राहिले होते. (या प्रकल्पातील दत्ताजींचा सहभाग हा स्वतंत्रपणाने दखल घेण्याचा विषय आहे.) विद्यापीठाच्या क्षेत्रातील सिनेट, कार्यकारिणीच्या वा विद्यार्थी संघाच्या निवडणुकांच्या संदर्भातील चर्चा, मसलती, विचार-विनिमय याच्या केंद्रस्थानी दत्ताजी असत. त्यामुळे त्या संबधातल्या भेटी-बैठकी होत त्या केदारवरच. या सगळ्या जगड्व्याळ व्यापातून आणि व्यवहारातून केदारवर होणाऱ्या राबत्याची कल्पना करणेही अवघड आहे. या सगळ्यांची उठबस, सरबराई आणि आवश्यक ते सगळे आगत-स्वागत दत्ताजींच्या वहिनी अतिशय आत्मीयतेने आणि परिश्रमपूर्वक करीत हे आवर्जून नमूद करायलाच हवे.
दत्ताजींच्या वहिनी हा त्यांच्या विशाल विश्वातला एक विशेष अध्याय आहे. नागपूरच्याच माधवराव तारणेकर यांची कन्या इंदुमती. तारणेकर परिवार विदर्भातील एक प्रतिष्ठित, आध्यात्मिक परिवार आहे. अमरावती संस्थानचे कारभारी पद तारणेकरांकडे होते. माधवरावांचे चिरंजीवही संस्थानचे व्यवस्थापक होते. ते स्वतः उत्तम प्रवचनेही करीत. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचा नागपूरच्या महाल भागात एक मठ आहे. बाबाजी महाराज पंडित या मठाची गादी सांभाळत. तारणेकर परिवार या मठाचा अनुयायी होता. इंदुमती माधवराव तारणेकर यांनी त्या काळातल्या व्हर्न्याक्युलर फायनल (इयत्ता ७वी) पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एस.टी.सी. (स्टाफ ट्रेनिंग कॉलेज – शिक्षिका प्रशिक्षण) चा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. परंतु नोकरी करण्याची तेव्हा आवश्यकता नव्हती. लग्नही त्या काळाच्या प्रथेप्रमाणे लौकरच झाले होते. काशिनाथराव डिडोळकर यांच्याशी विवाह होऊन इंदुमती तारणेकर उषा डिडोळकर बनल्या. पुढे १९६५ मध्ये काशिनाथ रावांच्या निलंबनाची समस्या उद्भवली तेव्हा दीड-दोन वर्षे उषा वहिनींनी शिक्षिकेची नोकरी केली. निलंबन न्यायालयानेच रद्दबादल ठरविले. काशिनाथराव पुन्हा नोकरीवर रुजू झाले ते केवळ हक्क बजाण्यापुरतेच. लगेचच त्यांनी नोकरी सोडली. मात्र त्यानंतर दोन-तीन वर्षेच त्यांना आयुष्य लाभले. प्रकृती वयोवृद्ध आईची बिघडली होती, परंतु अकल्पितपणे निघून गेले ते काशिनाथराव. जेमतेम पन्नाशीतच त्यांचे निधन झाले.
वयाच्या चाळीशीच्या आसपासच उषावहिनींवर वैधव्याचे दुर्दैव ओढवले होते. तीन मुलांचे महाविद्यालयीन तर धाकट्या विद्याचे शालेय शिक्षण सुरू होते. वृत्तीने त्या अत्यंत धार्मिक होत्या. सोवळ्या-ओवळ्याचे अत्यंत कसोशीने पालन करीत. त्यामुळे स्वयंपाकगृहात त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाला मर्यादित प्रवेश असे आणि दत्ताजींचा व्याप एवढा मोठा, येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या इतकी प्रचंड की पाकगृह सदैव सक्रिय ठेवावे लागत असे. सकाळी ८ वाजताच दत्ताजींचा दिवस सुरू होत असे आणि भेटायला येणाऱ्यांची रीघही सकाळपासूनच लागलेली असे. त्यामुळे सकाळी ७।।-८ वाजता चुलीवर चढलेले चहाचे भांडे अक्षय पात्रासारखे सतत भरलेले ठेवावे लागे. साग्रसंगीत देवपूजा, सर्वांची सकाळची न्याहरी, मुलांच्या शाळा-कॉलेजला जाण्याच्या वेळानुसार त्यांची व्यवस्था, सगळ्यांची सकाळची आवराआवर आणि आल्या गेल्या सर्वांचे आतिथ्य… या सगळ्याचा समतोल सांभाळायचा म्हणजे तारेवरची कसरतच. ती करताना दमणूक तर होत असणारच. पण काकू ती सारी आनंदाने झेलत हसतमुखाने, तत्परतेने आणि आपलेपणाने त्या सारी कामे एकहाती पार पाडत. वैतागाचा सूर त्यांच्या तोंडून कधी कोणी ऐकला नाही,’ मुद्रेवरही कधी कंटाळलेपणाचा भाव कोणी पाहिला नाही.
कमीत कमी दहा-बारा जणांचे जेवणखाण आणि दिवसभर चाललेला चहा-फराळाचा व्याप यांचा पाकगृहावर येणारा भार एकट्या उषावहिनींच्या अंगावर टाकणे दत्ताजीनाही रुचले नसणारच. संघाच्या महाल कार्यालयातला आचारी मंगलप्रसाद याच्या भावाला त्यांनी वहिनींच्या मदतीसाठी आणले. परंतु त्याला पोळ्या करता येत नसत. स्वयंपाकाच्या अन्य बाबींमध्येही तो नवखा होता. उषावहिनींनी त्याला पोळ्या लाटायला शिकवले, स्वयंपाकात पारंगत केले. पुढे त्याचा मुलगा रामरूप यालाही त्यांनी आईच्या मायेने घडवले. रामरूप तर आजही त्यांच्या आठवणीने सद्गदित होतो. प्रसंगविशेषी विद्याच्या – दत्ताजींच्या सर्वात धाकट्या पुतणीच्या घरी येतो. ‘तुमच्या घरी पाहुणे असतील विशेषतः डिडोळकर परिवार एकत्र येत असेल तेव्हा मला अवश्य बोलवा, मी सर्वांचे जेवण बनवीन…’ असे सांगताना रामरूपचे डोळे पूर्वस्मृतींनी डबडबतात. उषावहिनींच्या ठायी असलेला मातृत्वाचा अनुभव विद्यार्थी परिषद, जेटीसी, संघ या सगळ्याच क्षेत्रातल्या असंख्य तरुण-तरुणींनी घेतला आहे. SEIL प्रकल्पांतर्गत आलेले ताले गोंगो आणि ताचे गोंगो हे दोघे अरुणाचली विद्यार्थी तीन वर्षे ‘केदार’ मध्ये राहिले. विष्णू भोसे, शंकर भोसे हे दोघे भाऊ, चारूदत्त सावजी, शिवशंकर पिल्ले, सुनील पाळधीकर, सैदा रेड्डी…. किती नावे सांगावीत! अलका महाशब्दे परिषदेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी घराबाहेर पडली. तीही वर्षभर ‘केदार’ वरच राहिली. उषावहिनी या सगळ्यांच्या लेखी त्यांच्या आत्मीय काकू बनल्या.
घराचा सारा आर्थिक भार दत्ताजी समर्थपणे सांभाळत होते. मात्र गृहकृत्याचे अन्य सर्व पैलू काकू सहजपणे आणि कर्तव्यबुद्धीने साकार करीत होत्या. त्यांच्या या कर्तव्यतत्परतेला कृतज्ञतेची जोड अर्थातच होती. परंतु त्यांच्या मूळ प्रवृत्तींमध्येच गृहलक्ष्मीविषयीच्या पारंपरिक संकल्पनेची सारी वैशिष्ट्ये सामावलेली होती. मुलांचे संगोपन, पाहुण्यांचे अतिथ्य, कूळधर्माचे पालन, आप्तेष्टांचे क्षेमकुशल आणि घरात सदैव प्रसन्नतेचे वातावरण या सगळ्या बाबींकडे त्या दक्षतेने पण संयमित अबोलपणाने लक्ष पुरवीत होत्या. बंधूंचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाना खचू न देता, वहिनीच्या आत्मसन्मानाला तिळमात्रही धक्का लागू न देता पालकाची सारी जबाबदारी धीरोदात्तपणे पेलणारे दत्ताजी जितके थोर, तितक्याच वैधव्याचा आघात अकल्पित, अचानक आणि अकाली ओढवल्यानंतर थोडीथोडकी नव्हे, तीस-पस्तीस वर्षेपर्यंत अतिशय धीराने संसार निभावणाऱ्या काकूही धन्य होत असेच म्हटले पाहिजे. दीर – वहिनीच्या नात्याचे सारे पावित्र्य मन:पूर्वक जपून या दोघांनीही एक अतिशय आगळा आदर्श प्रस्थापित केला. त्यातून काशिनाथराव डिडोळकर यांचा अडखळता परिवार नुसता सावरला गेला एवढेच नाही तर, अत्यंत स्थिरतेने आणि सन्मानाने प्रगतीही करू शकला. वहिनींना बंधुतुल्य आधार, पुतणे कंपनीला पितृतुल्य आश्वासन आणि कार्यकर्त्यांना अत्यंत विश्वासाचे स्थान उपलब्ध करून देणारे घर असे अत्यंत संपन्न कुटुंबजीवन ‘केदार’ मध्ये आकाराला आले.
जेटीसी आणि अभाविप या दोन्ही कार्यक्षेत्रामुळे उमलत्या तरुणवयीन समूहाशी दत्ताजींचा नित्य संपर्क आणि संवाद राहिला. त्यांच्या स्वतःच्या वयाने चाळीशी ओलांडली होती. परंतु मनोवृत्ती आणि उमेद – उत्साहाच्या बाबतीत ते तरुणांप्रमाणेच प्रफुल्ल आणि प्रसन्न असत, त्याचबरोबर हितकर्त्या पालकाचा परिपक्व आणि प्रगल्भ सहवासही त्यांच्या रूपाने तरुण पिढीला लाभत असे. विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक आणि वैचारिक बांधणीला याच काळात आकार प्राप्त होत होता. खऱ्या अर्थाने ‘अखिल भारतीय’ संघटन होण्याच्या दिशेने परिषदेचा प्रवास सुरू झाला होता. १९६४ च्या नागपूर येथील अधिवेशनात दत्ताजी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले याचा उल्लेख या आधी केला आहेच. कौटुंबिक जीवनात स्थैर्य निर्माण करण्याला प्राधान्य देत असतानाही सामाजिक सहभागाचे भान दत्ताजींनी मनावेगळे केले नव्हते.