राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक हा घटक वैशिष्ट्यपूर्ण आहे. संघटनेचा विस्तार, दृढीकरण इत्यादीच्या बाबतीत या घटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तसे पाहिले तर तांत्रिक परिभाषेत प्रचारक व्यवस्था ही अनौपचारिक आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात सर्व स्वयंसेवकांच्या दृष्टीने प्रचारक ही सर्वाधिक आदराचे स्थान असलेली व्यक्ती असते. अन् तरीही लौकिकाच्या प्रसिद्धीच्या वलयापासून प्रचारक पूर्णपणे अलिप्त असतो. ‘सिद्धांतों पर अपने डटकर, संघनीव को भरना है अहंकार, व्यक्तित्व हृदय से, पूर्ण मिटाकर चलना है… या संघातच गायल्या जाणान्या गीतातून प्रचारकाच्या मानसिकतेचे समर्पक वर्णन करण्यात आले आहे. अन् विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, वैचारिक- बौद्धिक वा तात्त्विक पातळीवर मांडल्या जाणाऱ्या या मानसिकतेचा तंतोतंत अवलंब प्रत्यक्ष व्यवहारात केला जातो. अहंकारजन्य चढाओढ, व्यक्तिनिष्ठ हेवेदावे यांच्यामुळेच अत्यंत उदात्त तात्त्विक ध्येयवाद मांडणान्या संस्था-संघटना विखुरतात असा अनुभव समाज जीवनात सहसा येत असतो. संघाची संघटना मात्र नव्वद वर्षे उलटली तरीही अभेद्य आहे, इतकेच नव्हे तर, दिसामाशी सतत वृद्धिंगत राहिली आहे. एक दोन नव्हे तर सहा सरसंघचालकांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांच्या सात-आठ पिढ्या संघकार्याच्या मांडवाखालून वाटचाल करून गेल्या आहेत. देशातली राजकीय-सामाजिक परिस्थिती या कार्याच्या दृष्टीने अनुकूल तर सोडाच; सर्वथा प्रतिकूलच राहत आली. ब्रिटिश काळापासून ही संघटना नेस्तनाबूत करण्याचे, चिरडून टाकण्याचे सर्वकष प्रयत्न सर्व शक्तिनिशी अनेकदा करण्यात आले. अत्यंत घृणास्पद आणि धादांत खोट्या अपप्रचाराची राळ उडवून संघाची प्रतिमा कलंकित करण्याचे उपद्व्याप तर सातत्याने सुरू आहेत आणि तरीही त्या साऱ्यांना शांतपणे पचवून दर दिवसागणिक संघाचे काम प्रगतिपथावर राहिले आहे. भल्या भल्यांना चक्रावून टाकणाऱ्या या संघ-किमयेचे रहस्य ज्या ज्या बाबींमध्ये सामावले आहे त्यापैकी ‘प्रचारक यंत्रणा’ ही एक महत्त्वाची बाब आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लौकिक पातळीवरील व्यक्तिगत जीवन (निदान काही काळापुरते) बाजूला ठेवून संघकार्यासाठीच संपूर्ण वेळ देण्याचा निर्णय दरवर्षी अनेक तरुण घेतात. हा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला असला तरीही प्रत्यक्ष कार्याचे क्षेत्र आणि स्वरूप याविषयीचा निर्णय सर्वस्वी संघटनेच्या अधीन सुपूर्द करून टाकतात. काही वर्षे असे पूर्ण संघटनशरण काम करून त्यानंतर आपल्या व्यक्तिगत जीवनाकडे वळतात. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांमध्ये असे काम केलेल्या प्रचारकांची संख्या हजारोंमध्ये मोजावी लागेल. यातलेच काही जण काम करता करताच जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर ‘आपले प्रचारक सामाजिक जीवन हेच व्यक्तिगत जीवन’ अशी मानसिक अवस्था सहजगत्या प्राप्त करतात. अशा आजीवन प्रचारक राहिलेल्यांचीही आजवरची संख्या हजारांच्या परिभाषेत पोचली असेल. अशा प्रचारकांची जीवने अक्षरशः कापरासारखी समाजयज्ञात जळून गेली. राखेच्या रूपानेही शिल्लक राहायचे नाकारत, परंतु सामाजिक पर्यावरणाच्या शुद्धिकरणासाठी उपकारक ठरत…! ज्यांनी तुलनेने अल्पकाळ प्रचारक म्हणून काम केले तेही आपल्या साऱ्या उर्वरित जीवनासाठी एक विशिष्ट दृष्टिकोन प्राप्त करूनच व्यक्तिगत जीवनाकडे वळले. सामाजिकतेला आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतच आपापल्या जीवनाची मांडामांड करण्याची प्रेरणा त्यांना लाभलेल्या त्या जीवनदृष्टीने जागविली. ‘नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही, गेलो आम्ही, भगवन् तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो आम्ही…’ या भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरोद्गारांवर दावा सांगणारी कृतार्थ जीवने अशा प्रचारकांनी समाज जीवनात विरघळून टाकली आहेत. दत्ताजी डिडोळकर हे अशाच ‘दावेदार’ प्रचारकांपैकी एक म्हटले पाहिजेत. प्रचारकी जीवन तर ते धन्यतेने जगलेच, पण व्यक्तिगत जीवनही प्रचारकी वृत्तीनेच व्यतीत केले त्यांनी.
१९५४ ते १९६४ अशी दहा वर्षे दत्ताजी मद्रास प्रांत प्रचारक म्हणून काम करीत होते. नित्य संघकार्याचा विस्तार तर या काळात त्यांनी केरळ आणि तामीळनाडूच्या सर्व भागांत प्रभावीपणे घडवून आणलाच. त्याबरोबरच त्यांनी केलेली एक संस्मरणीय कामगिरी म्हणजे कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभारण्याच्या योजनेचा केलेला सूत्रपात! विवेकानंदांचे अत्यंत देखणे स्मारक आज कन्याकुमारी येथे उभे आहे. जगभरातून दीड ते दोन लाख पर्यटक दरवर्षी या स्मारकास भेट देतात. पौराणिक कथेनुसार देवी कन्याकुमारीची आणि त्यानंतर स्वामी विवेकानंदांची तपस्याभूमी असलेल्या समुद्रवेष्ट श्रीपाद शिलेवर उभ्या असलेल्या या देखण्या स्मारकाची निर्मिति कथा अत्यंत रोमहर्षक आहे. पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रूपये खर्चून उभ्या करण्यात आलेल्या या स्मारकाची सारी योजना पूर्णपणे लोकसहभागातून आणि केवळ सहा वर्षांच्या काळात पूर्ण करण्यात आली. आजही अविश्वसनीय वाटणाऱ्या या अभियानाचे धुरंधर नेतृत्व ज्येष्ठ संघ कार्यकर्ते एकनाथजी रानडे यांनी केले हे सर्वश्रुत आहे. मात्र या योजनेच्या संकल्पनेचा जन्म झाला दत्ताजी प्रचारक असल्याच्या काळात. एवढेच नव्हे तर, या कल्पनेच्या जन्मकाळात जो संघर्ष त्यासाठी करावा लागला त्याचे नेतृत्व दत्ताजींनी केले होते. याही संघर्षाचा इतिहास रोमांचक आहे.
१९६२ साली स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. देशात सर्वत्र हे वर्ष थाटामाटाने साजरे केले गेले. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते अग्रभागी होते हे वेगळे सांगायला नकोच. विशेषतः तामीळनाडू प्रांतात-मद्रास, कन्याकुमारी परिसरातील स्वयंसेवकानी अधिक उत्साहाने हा कार्यक्रम साजरा केला. १२ जानेवारी १९६३ रोजी स्वामीजींचा १०० वा जन्मदिवस येणार होता. त्याआधीचे संपूर्ण वर्ष जन्मशताब्दी वर्ष या नात्याने साजरे करण्याचा निर्णय संघ कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे जानेवारी १९६२ पासूनच या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यास प्रारंभ झाला. मद्रास प्रांताचे तत्कालीन प्रांत प्रचारक या नात्याने दत्ताजी या नियोजनाचे स्वाभाविक प्रमुख होते. या नियोजनाविषयीच्या क्रमातच सागरातील ‘श्रीपाद शिला’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खडकावर स्वामीजींचे स्मारक उभे करण्याची सूचना समोर आली.
कन्याकुमारी गावाच्या किनाऱ्यापाशी तीन सागरांचा संगम होतो. या संगमाच्याच स्थानी समुद्रात असलेल्या शिळाखंडावर देवी पार्वतीने कन्याकुमारीच्या रूपात भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली अशी हिंदू जनमानसाची प्राचीन श्रद्धा आहे. त्या शिलेवर कन्याकुमारीचे पदचिन्ह आजही पहायला मिळते. कन्याकुमारी गावात किनाऱ्यालगतच देवी कन्याकुमारीचे एक प्राचीन मंदिरही आहे. कन्याकुमारी देवीच्या तपस्येने पुनीत झालेल्या या शिलेवरच स्वामी विवेकानंद यांनी तीन रात्री मुक्काम करून एकांतात चिंतन केले होते. श्री रामकृष्ण परमहंसांच्या निर्वाणानंतर उन्मनी अवस्थेत स्वामी विवेकानंदांनी भारत परिक्रमा केली. रामकृष्णांच्याच संकेतानुसार आपल्या समाजाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हे परिभ्रमण केले. ‘व्यक्तिगत मोक्षाची साधना हे तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट नाही, त्यापेक्षा ते व्यापक आणि विशाल आहे. त्या उद्दिष्टाचा शोध घेण्यापूर्वी आपल्या विशाल समाजाचे आणि देशभूमीचे दर्शन घे…’ असा मार्गदर्शनपर संदेश रामकृष्णांनी नरेंद्रला दिला होता. त्यानुसार १८८८ ते १८९२ अशी चार वर्षे सबंध भारतवर्ष हिंडून नरेंद्र कन्याकुमारीला पोचले. समुद्रातील अंतर पोहून जातच ते श्रीपाद शिलेवर पोचले आणि तेथे २५, २६, २७ डिसेंबर १८९२ असे तीन दिवस राहून त्यांनी आपल्या जीवनोद्देशाविषयी चिंतन केले. या चिंतनातूनच त्यांना ‘सनातन वैदिक चिंतनाच्या प्रकाशात प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनरूज्जीवन आणि आत्मविस्मृत झालेल्या समाजाच्या जागृतीतून राष्ट्रीय पुनर्निर्माण घडविण्याचा विराट प्रयत्न करणे’ हे आपले जीवनोद्दिष्ट गवसले. या उद्दिष्टाप्रत अग्रेसर होण्याच्या निर्धारानेच विवेकानंद परतले आणि काही दिवसांनीच मे १८९३ मध्ये शिकागो येथील धर्म परिषदेसाठी रवाना झाले हा इतिहास आहे. स्वाभाविकच स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात श्रीपाद शिलेचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच तेथे भव्य स्मारकाच्या रूपाने विवेकानंदांची प्रेरणा चिरंतन स्वरूपात जपणारे प्रतीक उभे करावे असे कार्यकर्त्यांना वाटले. जन्मशताब्दी वर्षातच हा संकल्प एका राष्ट्रीय अभियानाच्या रूपाने सोडावा असे कार्यकर्त्यानी ठरविले. अर्थात अशा कोणत्याही शुभसंकल्पाला अपशकुन करणाऱ्या काही प्रवृत्ती असतातच. कन्याकुमारी येथील कार्यकर्त्यानाही अशा प्रवृत्तींना सामोरे जाण्याचा प्रसंग आलाच.. आणि दत्ताजीनी त्या (तथाकथित) आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्याची प्रेरणा अतिशय प्रभावीपणे जागविली.
स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाची कल्पना स्वाभाविकपणे समाजात प्रसारित झाली आणि त्या भागात प्रभावी असलेली धर्मवेडी कॅथॉलिक ख्रिश्चन मंडळी चवताळली. कन्याकुमारीच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांपैकी अनेकजण धर्मांतरीत होऊन ख्रिश्चन झाले होते. त्या समूहाला ख्रिश्चन धर्ममार्तंडानी उत्तेजित करण्यास सुरुवात केली. प्रस्तावित विवेकानंद स्मारकाला निकराचा विरोध करण्यासाठी ते सरसावले. समुद्रातील शिलाखंड ही विवेकानंद शिला नसून सेंट झेवियर्स रॉक आहे असा प्रचार त्यांनी सुरू केला. अन् झेवियर्स रॉकवर विवेकानंदांचे स्मारक उभारले जाऊ नये अशी हट्टाग्रही भूमिका घेण्यास त्यांनी मच्छिमार बांधवांना प्रोत्साहित केले. आपला दावा प्रस्थापित करण्यासाठी ह्या खडकावर त्याच मच्छिमार बांधवांच्या माध्यमातून एक क्रॉस उभारला गेला. चार एप्रिल १९६२ रोजी दंडेलीने हे दुःसाहस कॅथॉलिक ख्रिश्चनांच्या धुरिणांनी केले. दत्ताजी या साऱ्या घटनाक्रमाकडे शांतपणे पण दृढनिश्चयाने पहात होते. उत्तेजित न होता धीराने हा विरोध मोडून काढण्याची योजना त्यांच्या मनात आकार घेत होती. ख्रिश्चन धर्ममार्तंडानी सामान्य मच्छिमारांना समोर करून विरोधी आघाडी उभारण्याची धूर्त खेळी केली होती. तिला तशाच चातुर्याने शह द्यायला हवा याची जाणीव दत्ताजींच्या मनात स्पष्ट होती. विरोधात्मक जनभावना चेतविण्याचा प्रयत्न समर्थक जनभावना संघटीत करण्याचा मार्ग अवलंबूनच निष्प्रभ करता येईल अशी खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास प्रारंभ केला.
एप्रिल १९६२ मधील उपद्रवकारक घटनाक्रमानंतर ऑगस्टमध्ये दत्ताजीनी एक जिल्हास्तरीय समिती संघटित केली. ‘कन्याकुमारी जिल्हा स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी समिती’ या नावाच्या या तदर्थ (अव-हेल) समितीमध्ये एकूण २२ सदस्य होते. त्यातील बहुतांश, नव्वद टक्क्यांहून अधिक सदस्य स्थानिक असतील याची काळजी त्यांनी घेतली. आर. गोपालन (पुढे हिंदू मुन्नानी या समर्थ संघटनेचे अध्यक्ष झालेले), पी. महादेवन (यांनीही पुढे एकनाथजी रानडेंसोबत स्मारक निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली) यांच्यासारख्या मान्यवर लोकांचा समितीत समावेश होता. एम. नंजप्पा हे प्रतिष्ठित गृहस्थ या समितीचे अध्यक्ष झाले. नागरकोईल येथे या समितीचे मुख्यालय करण्यात आले. स्मारक निर्मिती सुलभ होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावले पुढे या समितीच्याच माध्यमातून टाकली जाऊ लागली. बावीस जणांच्या या समितीत स्वतः दत्ताजींचे नाव अकराव्या स्थानावर होते.
कन्याकुमारी मंदिराची मालकी असलेल्या ‘कन्याकुमारी देवस्वम् बोर्ड, सुचिंद्रम्’ या संस्थेच्या अध्यक्षांच्या नावे जन्मशताब्दी समितीने एक रीतसर अर्ज केला. कन्याकुमारी देवीच्या मंदिर परिसरापासून विवेकानंद शिलेपर्यंत जाण्यासाठी एक ‘नावेची सेवा’ (Ferry Boat-service) सुरू करण्याची अनुमती या अर्जाद्वारे मंदिर विश्वस्त समितीकडे मागण्यात आली. मंदिर समिती (देवस्वम् बोर्ड) ने १५ दिवसातच तशी अनुमती एका लेखी पत्राने दिली. दरम्यान या कामासाठी मनुष्यबळ उभे करण्याची योजना दत्ताजींच्या पुढाकाराने आखण्यात आली होती. केरळच्या किनारी क्षेत्रात मच्छिमारी करणाऱ्या कुशल नावाडी स्वयंसेवकांचे एक १५ जणांचे पथक तयार करण्यात आले. कोचिन येथून दोन नौका (वल्हविण्याच्या) खरेदी करण्यात आल्या. ए. व्ही. बालन आणि पी. लक्ष्मणन् या दोघांच्या नेतृत्वाखाली १५ जणांचे हे पथक त्या दोन नौकांसह १९ सप्टेंबर १९६२ रोजी कन्याकुमारीत दाखल झाले आणि त्याच दिवशी सायंकाळी विवेकानंद शिलेपर्यंत जा-ये करणाऱ्या नौका सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
आता जिल्हा समितीने पुढचे पाऊल उचलले. मद्रास राज्य सरकारकडे स्वामी विवेकानंदांचा पुतळा शिलेवर उभारण्यासाठी आणि जाण्यायेण्यासाठी शिलेपर्यंत एक पादचारी पूल उभारण्यासाठी अनुमती मागणारा अर्ज करण्यात आला. दुसऱ्या बाजूने शिलेवर अतिक्रमण करून लावण्यात आलेला क्रॉस हटविण्याची योजनाही आखण्यात आली. या योजनेबरहुकूम स्वयंसेवकांनी केलेले धाडस आणि उपद्रवकारी ईसाई मंडळींनी वेळोवेळी निर्माण केलेले अडथळे यांच्यातली चुरस आता वाढीला लागली. कन्याकुमारी परिसरातल्या वातावरणात अकारण तणाव निर्माण झाला. सरकारी स्तरावर, कायदा- सुव्यवस्था यंत्रणाना दखल घेणे अपरीहार्य झाले. किनारपट्टीवर आणि शिला परिसरात वावरावर मर्यादा घालण्यासाठी सरकार जमावबंदीचा हुकूम जारी करणार अशी चिन्हे दिसू लागली. दत्ताजी आणि त्यांचे सहकारी अत्यंत जागरूक होते. बालन आणि लक्ष्मण यांच्यासह १५ केरळी नावाडी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांची कुमक दोन नौकांसह येऊन दाखलही झाली होती. पुढील पंधरा-वीस दिवसांत कार्यकर्त्यानी आवश्यक कारवाई कशी तडफेने आणि तत्परतेने पार पाडली हे स्वत: पी. लक्ष्मणन यांच्याच शब्दात जाणून घेता येते. विवेकानंद केंद्र पत्रिका या नियतकालिकातर्फे स्मारकाच्या पूर्ततेला पंचवीस वर्षे होत असताना ऑगस्ट १९९५ मध्ये The Saga of Vivekananda Rock Memorial (विवेकानंद शिला स्मारकाचे पर्व) हा एक विशेष ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथात पी. लक्ष्मणन् लिहितात, “मी संघाचा कार्यकर्ता. १९६२ साली कालिकत जिल्ह्याचे प्रचारक श्री. व्ही. पी. जनार्दनन यांनी मला भेटायला बोलवले. मी भेटलो तेव्हा ते म्हणाले, ‘कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र तेथे एक क्रॉस उभारून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परिस्थिती गंभीर आणि जोखमीची आहे. हिंसक संघर्षाला तोंड द्यावे लागेल, जीवही धोक्यात घालावा लागेल. तू तिथे जाण्यास तयार आहेस का?’ काही वेळ विचार केला आणि अशा दिव्य . कार्यासाठी आवश्यक तर बलिदान देणे ही भाग्याचीच गोष्ट आहे असे मानून मी जबाबदारी घेण्यास तयार झालो. त्यानंतर कोल्लम येथील ए. व्ही. बालन यांना मी भेटलो. आम्ही दोघे कन्याकुमारी जिल्हा प्रचारक आर. वेंकटरमण यांना भेटलो आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन तेथे उभ्या करण्यात आलेल्या क्रॉसची आणि एकूण परिस्थितीची पाहणीही करून आलो. शिलेपर्यंत ‘नौका-सेवा’ सुरू करण्याच्या दृष्टीने उपयुक्त जागेचीही निवड केली (याच जागेवरून आजही नौका स्मारकापर्यंत जाते येते) नंतर काहीच दिवसांनी ट्रकमधून दोन नौका कन्याकुमारी येथे घेऊन गेलो. ए. व्ही. बालन यांनी केरळच्या विविध जिल्ह्यातून तेरा तरुण स्वयंसेवक जमविले होते. तेही सर्वजण कन्याकुमारीला आले. प्रारंभी आम्ही किनाऱ्यापासून शिलेपर्यंत विनाशुल्क नौका सेवा सुरू केली. शाळेतील मुले आणि तरुणांना घेऊन आम्ही शिलेच्या दर्शनासाठी नेत असू…’
अत्यंत नियोजनबद्ध रितीने संघाचे कार्यकर्ते स्मारकाच्या निर्मितीचा निर्धार आकाराला आणण्यासाठी निघाले होते. केवळ शून्यातूनच पुढे जायचे नव्हते तर, विरोध नकारात्मकता यांच्यावर मात करून साध्य गाठायचे होते. हाताशी वेळही मर्यादित होता आणि उपलब्ध साधने, मनुष्यबळ, अनुकूलता या सगळ्याचीच वानवा होती. उद्दिष्टाविषयीची स्पष्टता, ते उद्दिष्ट सर्वथा योग्य आणि उदात्त असल्याविषयीचा दृढविश्वास आणि ठाम मनोधैर्य यांची भक्कम पुंजी मात्र सोबतीला होती. विजयादशमीचा दिवस जवळ येत होता. कन्याकुमारी देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव थाटात सुरू होता आणि दत्ताजी आणि सहकारी एका आगळ्या सीमोल्लंघनाचा विचार करीत होते. बालन, लक्ष्मणन, त्यांचे सवंगडी आणि दत्ताजी डिडोळकर यांची एक बैठक झाली. त्याबाबत पी. लक्ष्मणन आपल्या निवेदनात लिहितात, “… मद्रास आणि केरळ या दोन्ही प्रांतांचे प्रचारक असलेल्या दत्ताजी डिडोळकर यांना आम्ही भेटलो. विजयादशमीच्या एकच दिवस आधी त्यांनी आम्हाला सांगितले की आपल्याला ‘तो’ क्रॉस तिथून हटवायचा आहे. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही पाचजण खडकावर गेलो, परंतु फारशी साधनसामुग्री आमच्यापाशी नसल्याने क्रॉस हटविता आला नाही. मग परत येऊन आवश्यक हत्यारे घेऊन (त्याच रात्री) आम्ही परत खडकावर गेलो. २९ सप्टेंबर १९६२ च्या त्या रात्री आम्ही तो क्रॉस उखडून टाकला…!”
अर्थात समस्या एवढी सहज आणि लौकर सुटण्याइतकी सोपी नव्हती. इरेला पेटलेली ख्रिस्ती मंडळीही जिद्दी होती. बोटचेप्या शासकीय धोरणाची साथ आपल्याला मिळेल याची त्यांना खात्री होती. सेंट झेवियर्सच्या नावाने त्या शिलेवरील दावा क्रॉसच्या माध्यमातून पक्का करायचा आणि एकदा का ती जागा ‘वादग्रस्त’ बनविली की स्मारकाच्या योजनेचा बोजवारा उडविण्यास वेळ लागणार नाही असे त्यांचे मनसुबे होते. मात्र संघाची मंडळीही हे मनसुबे पुरेपूर जाणून होती आणि ते सगळे उधळून स्मारकनिर्माणाचा मार्ग निर्वेध बनवण्याच्या निर्धारावर अटळ होते. क्रॉस उखडून लावला गेल्याने चवताळलेल्या ख्रिश्चन बगलबच्चांनी ‘आता त्या जागेवर पुन्हा एक क्रॉस स्थापन केला. सप्टेंबर १९६२ च्या तीस तारखेला लावलेला हा क्रॉस दगडी होता आणि अधिक मजबूतीने रोवला गेला होता. चुरस आता अटीतटीला येऊन पोचली होती. २ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजल्यापासूनच त्या परिसरात जमावबंदी लागू केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती संघ स्वयंसेवकांच्या कानावर आली. एकदा सुरक्षा यंत्रणांनी परिसर ताब्यात घेतला की यथास्थितीचेच संरक्षण होणार होते. पर्यायाने १४४ कलम लागू केले जाण्यापूर्वीच नवा क्रॉस तेथून हटवणे अत्यावश्यक होते. बालन आणि लक्ष्मणन यांची टीम आता त्या दृष्टीने पुढे सरसावली.
. त्या दिवशी पहाटे ४ पासूनच आम्ही किनाऱ्यावर जमू लागलो. धूसर प्रकाशात शिलेवरचा क्रॉस दृष्टीस पडत होता. उजेड अधिक स्पष्ट होईपर्यंत आम्ही थांबलो. कन्याकुमारी मंदिर परिसरात ठेवलेली एक नौका खांद्यावरून किनाऱ्यापर्यंत घेऊन गेलो आणि आणखी चार सहकाऱ्यांसह शिलेवर गेलो. त्यावेळी आसपास फार कोणी नव्हते. तीन-चार होड्या समुद्रात मच्छिमारी करीत फिरत होत्या तेवढ्याच किनाऱ्यावरून बालन पांढऱ्या रुमालाद्वारे १४४ कलम जारी करण्याची वेळ अगदी जवळ आली असल्याचा ईशारा दर्शवीत होते. आम्ही पाच जणांनी क्रॉस उखडून टाकला आणि नौकेतून परत निघालो. मात्र दरम्यान चर्चने जोरजोरात घंटानाद केला. परिणामी अक्षरश: हजारोंचा जमाव किनाऱ्यावर जमला. २-३ नौकाही आमचा पाठलाग करू लागल्या. आम्ही भर समुद्रातच होतो. समुद्रातही काही मच्छिमार आमच्या दिशेने झेपावण्याचा प्रयत्न करीत होते, तर किनाऱ्यावरही हिंसक जमाव आमच्या ‘स्वागता’ साठी उभा होता. हल्ला आणि मारहाण अटळ दिसत होती. संघर्ष झालाच असता तर अर्थातच तो अत्यंत विषम ठरला असता. किनाऱ्यावर काही संघ कार्यकर्तेही मोजक्या संख्येने उपस्थित होते. अगदीच निर्वाणीची वेळ आली तेव्हा दत्ताजी आणि अन्य प्रमुख स्वयंसेवकांनी आक्रमक जमावाला उद्देशून म्हटले, ‘पहा, आम्ही प्रचारक आहोत, घरदार सोडून केवळ कार्यासाठी सर्वस्व झोकून देण्याच्या ठाम तयारीनेच आलो आहोत. त्यामुळे आम्हाला आमच्या जिवाची पर्वा नाहीय, मात्र वेळ आलीच तर सर्वशक्तिनिशी प्रत्याक्रमण केल्याशिवाय आम्ही राहाणार नाही आणि मरणारही नाही…!’ आम्ही ठामपणे नौकेवर उभे राहून येईल त्या प्रसंगाला तोंड देण्यास सज्ज होतोच… परिसरात अक्षरश: युद्धाच्या आघाडीसारखे – रणक्षेत्रासारखे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र अगदी ऐन वेळी उपजिल्हाधिकारी पोलिसांच्या ताफ्यासह तेथे पोचले, पोलिसांनी हवेत फैरी झाडल्या आणि जमावाला पांगविले. १४४ कलम जारी करीत असल्याची घोषणा पोलिसांनी केली. माझ्याबरोबर असलेल्या स्वयंसेवकांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र अनवस्था प्रसंग टळला आणि अर्थातच क्रॉस काढून टाकण्याची आमची कामगिरी फत्ते झाली…!”
अतिशय संयमाने पण हिमतीने आणि सहकारी कार्यकर्त्यांना प्रेरित करीत दत्ताजी स्मारक निर्मितीचा विषय हाताळत होते. दरम्यान देवस्वम् बोर्डाने शिलेवर विवेकानंद पुतळा स्थापन करण्यासाठी तसेच किनाऱ्यापासून शिलेपर्यंत पादचारी पूल बांधण्यासाठी आपली अनुमती देणारे पत्र कन्याकुमारी जिल्हा विवेकानंद जन्मशताब्दी समितीला पाठवले. आता हा विषय कन्याकुमारी जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नाही. स्मारक निर्मितीसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळविणे आवश्यक होते. तसेच स्मारकाच्या उभारणीसाठी व्यापक, देशस्तरीय अभियान चालविणेही आवश्यक होते. दरम्यान संघाच्या पातळीवरही या विषयीचा विचारविनिमय होऊन स्मारक समितीला अखिल भारतीय स्वरूप प्रदान करण्याचा निर्णय घेतला गेला होता. एवढेच नव्हे तर, तेव्हा संघाच्या सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळणारे एकनाथजी रानडे यांच्याकडे या अभियानाची जबाबदारी सोपविण्याचेही सरसंघचालक गुरूजी यांनी निश्चित केले. एकनाथजीना त्यासाठी सरकार्यवाहपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला गेला होता.
दरम्यान जिल्हास्तरीय समितीने स्मारकाची अनुमती द्यावी यासाठीचा अर्ज मद्रास राज्य सरकारकडेही (१९ सप्टेंबर १९६२ रोजी) पाठविला होताच. ख्रिश्चन मंडळीनी. आपला हेका सुरूच ठेवला होता. ‘शिलेवर असलेला क्रॉस ४०० वर्षांपूर्वीपासून तेथे. होता, सेंट झेवियर्सच्या आगमनाची स्मृती म्हणूनच तो क्रॉस तिथे उभारण्यात आला होता.’ असा धडधडीत खोटा कांगावा करीत त्यांनी विवेकानंद स्मारकाच्या प्रस्तावाला विरोध करणे सुरूच ठेवले होते. दाव्या-प्रतिदाव्यातून वातावरण तणावग्रस्तच होत राहिले. शेवटी राज्य सरकारने ‘शिलेवर अधिकार सेंट झेवियर्सचा की विवेकानंदांचा’ याबाबत निवाडा करण्यासाठी एक न्यायालयीन समिती नियुक्त केली. या समितीनेही निर्णय दिला की ‘ती शिला विवेकानंद शिलाच आहे आणि तेथे उभा केला गेलेला क्रॉस हे अवैध अतिक्रमण आहे…!’ या निर्णयामुळे क्रॉस की विवेकानंद पुतळा या वादाला पूर्णविराम मिळाला. एवढेच नव्हे तर सरकारी पुढाकाराने – ‘हे स्थळ स्वामी विवेकानंद यांनी तीन दिवस तपस्या केलेली भूमी असून येथेच त्यांना दैवी साक्षात्काराची स्फूर्ती प्राप्त झाली…’ अशा मजकुराचा एक फलक तेथे लावला गेला. ख्रिस्ती उपद्रव यामुळे पूर्णपणे शमला नाही, परंतु त्यातला जोर मात्र निघून गेला आणि त्यांचा (सेंट झेवियर्सबाबतचा दावा तद्दन पोकळ असल्याचे सिद्ध झाले.
केरळ प्रांतातील एक ज्येष्ठ आणि विख्यात व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता असलेले विद्वान मन्मथ पद्मनाभन् यांच्या अध्यक्षतेखाली एका अखिल भारतीय समितीची स्थापना • विवेकानंद शिला स्मारक समिती या नावाने करण्यात आली. १२ जानेवारी १९६३ रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शतक महोत्सवी जयंती निमित्त कन्याकुमारी येथे ए विशाल जाहीर सभा झाली आणि त्याच दिवशी विवेकानंद शिलेवर एक संगमरवरी फलक (वरील मजकुराचा ) स्मारकरूपाने समारंभपूर्वक लावण्यात आला. फेब्रुवारी १९६३ मध्ये, तीन तारखेला समितीची एक बैठक मद्रास येथे झाली. स्वामी चिन्मयानंद, गोळवलकर गुरुजी, मन्मथ पद्मनाभन्, महादेवन इत्यादी महानुभाव यावेळी उपस्थित होते. स्वामी चिन्मयानंद यांनी प्रस्तावित स्मारकासाठी दहा हजार रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली. ही स्मारकासाठी आलेली पहिली देणगी होती. पुढच्या काळात स्मारक निधीच्या संकलनासाठी देशभर राबविण्यात आलेले अभियान हा स्मारक निर्मितीच्या अध्यायातील एक झळझळीत पैलू आहे. पुढे मार्च १९६३ मध्ये अखिल भारतीय स्तरावरील विवेकानंद शिला स्मारक समितीची विधीवत नोंदणी (नोंदणी क्र. ३४/९६३) करण्यात आली.
स्मारकाच्या निर्मितीच्या दिशेने अशा प्रकारे ठोस पावले टाकण्यास सुरुवात झाली. सरकार दरबारी त्याबाबतचा गंभीर विचारविनिमय सुरू होणे क्रमप्राप्त बनले. त्याचबरोबर लौकिक तसेच सांगठनिक पातळीवरही स्मारक अभियान संघटित करण्याचे नियोजनही ठाम आकार घेऊ लागले. क्षुद्रबुद्धी ख्रिस्ती मंडळी संतापणे स्वाभाविक होते. त्या संतापाची अभिव्यक्ती शिलेवरील स्मारक फलक विद्रुप करून (दि. २४ एप्रिल १९६३ रोजी) करण्यात आलीतेवढ्यातेही समाधान झाले नाही म्हणून की काय १८ मे १९६३ रोजी तो फलक काढून समुद्रात फेकून देण्यात आला. मात्र आता असा कोणताही प्रयत्न वांझोटाच ठरणार होता. तरीही तो शासन दरबारी नजरेत आणून देण्याच्या दृष्टीने दत्ताजी डिडोळकर आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह (श्री. नंजप्पा, श्री. आर. शंकरन आणि श्री. एस. सूर्यनारायण राव यांचा या सहकाऱ्यांमध्ये समावेश होता) मद्रास राज्याच्या राज्यपालांना भेटले आणि त्यांच्यासमोर स्मारक अभियानाविषयीच्या एकूण परिस्थितीचे सविस्तर निवेदन करण्यात आले.
या आधीच नमूद केल्यानुसार एकनाथजी रानडे यांच्यावर संघातर्फे स्वामी विवेकानंद शिला स्मारक अभियानाचे काम सोपविण्यात आले. अकरा ऑगस्ट १९६३ रोजी मद्रास येथे झालेल्या स्मारक समितीच्या सभेत विशेष निमंत्रित या नात्याने एकनाथजी उपस्थित राहिले आणि त्याच सभेत त्यांच्या नावाची घोषणा विवेकानंद शिला स्मारक समितीचे संघटन सचीव या नात्याने करण्यात आली. एका अर्थाने कन्याकुमारी गावाच्या स्तरावर रोवल्या गेलेल्या बीजाचा विस्तार अखिल भारतापर्यंत पोचला आणि अभियानाच्या वटवृक्षाची चाहूल स्पष्ट झाली. या बीजारोपणाच्या कामाचे साक्षीभावी सूत्रधार होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मद्रास प्रांत प्रचारक दत्ताजी डिडोळकर. पुढे १९७१ मध्ये स्मारक साकार होईपर्यंतच्या सहा-सात वर्षात देशभरात या अभियानाचा घुमलेला शुभंकर घंटानाद हा अत्यंत रोमहर्षक इतिहास आहे.
योगायोगाने याच सुमारास दत्ताजींच्या जीवनात एक वेगळेच वळण आले आणि त्यांना आपले प्रचारकी जीवन थांबवून नागपुरात परतावे लागले. दत्ताजींच्या आईची प्रकृती बिघडली. वडील बंधूही आजारीच होते आणि त्यामुळे कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष घालण्यासाठी दत्ताजी परत येणे क्रमपाप्त बनले होते. अर्थात घरगुती व्यवहाराबरोबरच सार्वजनिक कामाची नवी क्षितिजे जणू नागपुरातून दत्ताजींची प्रतीक्षा करीत होती. विवेकानंद शिला स्मारक अभियानाची सूत्रे एकनाथजी रानडे यांच्या समर्थ हातांमध्ये सोपविली गेली होतीच, दत्ताजी अशाच नव्या कार्याची सूत्रे घेण्यासाठीच १९६४ च्या प्रारंभी नागपूरला परत आले.