विदर्भातील बुलढाणा जिल्हा विविध पैलूंनी समृद्ध आहे. या जिल्ह्यातील सिंदखेडराजा ही राष्ट्रमाता जिजाबाईंची जन्मभूमी. श्री संत गजानन महाराजांची कर्मभूमी शेगाव याच जिल्ह्यात. उल्कापाताने नैसर्गिक चमत्काराच्या रूपात साकार झालेले लोणार सरोवर याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच विशिष्ट नैसर्गिक स्थितीमुळे तप्त विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्धी मिळाली तीही बुलढाणा शहराला. या जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातले छोटेसे गाव डिडोळ ही डिडोळकर परिवाराची मूळ भूमी. जळगाव जामोद येथे या परिवाराची थोडीफार शेतीही होती. मात्र त्या काळातल्या प्रथेशी सुसंगत असणाऱ्या मोठ्या संख्येच्या परिवाराचा संपूर्ण चरितार्थ शेतीवर होणे शक्य नव्हते. त्यामुळे तीन-चार पिढ्यांपूर्वीच घरातील काही भाऊ नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने शहराकडे वळले. देवीदासराव डिडोळकर या क्रमात नागपूर येथे ब्रिटिश आमदनीतल्या कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करू लागले. जळगाव जामोद येथील शेतीत त्यांच्या वाट्याची दीड एकर जमीन होती. मात्र पुढे ती जमीन कसण्याकरिता त्यांच्या मुला-नातवंडांपैकी कोणी गावात न राहिल्याने ती जमीन डिडोळकर परिवाराने जळगाव जामोद नगर परिषदेला दान करून टाकली. आज तेथे गंगूबाई डिडोळकर यांच्या नावाने नगर परिषदेने एक उद्यान उभारले आहे. याच गंगूबाईंच्या पोटी दत्तात्रय देवीदासराव डिडोळकर यांचा जन्म १९२३ साली, ऑगस्ट महिन्याच्या सात तारखेला, प्रचलित परंपरेनुसार आईच्या माहेरी मलकापूर
येथे झाला. विश्वनाथ आणि काशिनाथ या दोघा मुलांच्या पाठीवर आणि शैलजा या सगळ्यात धाकट्या मुलीच्या आधी तिसऱ्या अपत्याच्या रूपाने दत्तात्रय डिडोळकरांच्या परिवारात दाखल झाले.
१९२० चे दशक भारतातील सामाजिक परिस्थितीच्या दृष्टीने काहीसे उलथापालथीचे होते. स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू १९२० मध्ये झाला. त्याआधीच महात्मा गांधीजींचा राजकीय चळवळीत प्रवेश झाला होता. टिळकांच्या निधनानंतर आंदोलनाची सूत्रे क्रमशः, पण निश्चितपणे गांधीजींच्या हातात जाऊ लागली होती. सामान्य जनतेच्या स्तरापर्यंत स्वातंत्र्य चळवळीचे वारे घुमू लागले होते. सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबून या चळवळीला शक्ती प्रदान करण्याचे प्रयत्नही जोरात होते. १९२३ च्या मार्च महिन्यातच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांना फासावर चढविण्यात आले होते. नागपुरात तिरंगा ध्वज फडकावीत मिरवणूक काढण्यास ब्रिटिश सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात झेंडा सत्याग्रह करण्यात आला. जालियनवाला बाग हत्याकांड तसेच अन्याय्य रौलट कायदा लागू करण्याचा ब्रिटीशांचा प्रस्ताव यासारख्या विषयांवर भारतीय जनमत अत्यंत प्रक्षुब्ध बनले होते. हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याची ब्रिटिशांची भेदनीती प्रबळ बनत चालली होती. हिंदुहिताचे संरक्षण करण्याबाबत खंबीर भूमिका घेण्यात काँग्रेसचे नेतृत्व दुबळे ठरत असल्याची भावना जोर धरू लागली होती. अशा साऱ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर १९२५ साली – म्हणजे दत्ताजींच्या जन्मानंतर दोनच वर्षांच्या आत डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाला सुरुवात केली होती. ‘हिंदूंची नित्यसिद्ध संघटना’ उभी करणे हे संघाचे उद्दिष्ट घोषित करण्यात आले होते. डिडोळकर परिवार या काळातच नागपूर येथे स्थिरावला होता.
दत्ताजींचे वडील नागपूरला कॉटन ट्रेडिंग कंपनीत नोकरी करीत होते. विश्वनाथ आणि काशिनाथ या दोघा ज्येष्ठ बंधूंचे शिक्षण नागपुरातच सुरू होते. चिटणीसपुरा येथे राहणे, नागपूरचा हा महाल, चिटणीसपुरा इ. भाग ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आद्यभूमी. महालातल्या मोहितेवाड्यातच पहिली संघशाखा सुरू झाली होती आणि वर्षभरातच संघशाखांचा विस्तार फोफावू लागला होता. मैदानावर भरगच्च संख्येने (अगदी दीडशे- दोनशे सुद्धा) जमलेल्या कुमार- किशोरांच्या शाखा रोज संध्याकाळी फुलू लागल्या होत्या. मैदानी खेळ, कसरती, कवायती, देशभक्तीपर गोष्टी-गीते इत्यादींच्या माध्यमातून बालवयातल्या उत्साह, जोषाला उत्तेजन देण्याबरोबरच शिस्त आणि राष्ट्रीयता यांचे संस्कार बळकट करण्यावर शाखेवरील कार्यक्रमांचा भर असे. शाखेत अर्थातच शालेय वयाच्या बालकांचा (संघाच्या परिभाषेत बाल आणि शिशू) मुख्यतः भरणा असे. शाखा चालविणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये थोडेसे मोठ्या वयाचे, तरुण असत. वडील देवीदासराव आणि दोघे मोठे भाऊ यांचाही संघशाखांशी संपर्क होताच. त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासून दत्ताजींचा संघशाखेशी नित्य संबंध सुरू झाला. खेळ, खोड्या, दंगामस्ती यासारख्या शैशवसुलभ बाबींना शाखेवर भरपूर वाव होता. घरातल्या वडिलधाऱ्यांची मानसिकताही मुलांभोवती अतिरिक्त संरक्षक कवच उभारून त्यांना चार भिंतींमध्ये बंदिस्त करण्याची नव्हती. उलट उघड्या मैदानावर भरपूर खेळावे, मित्रमेळा जमवावा यासाठी घरातून प्रोत्साहन असायचे. शाखेवर समवयस्क सवंगडी भरपूर मिळायचे. खेळांचेही आकर्षण होतेच. त्यासोबतच देशभक्तीपर गाणी, ऐतिहासिक महापुरुषांच्या रोमहर्षक गोष्टी इत्यादीतून बालमनांवर देशप्रेमाचे, सामूहिकतेचे आणि अनुशासनाचे संस्कारही सहजपणे अंकित होत असत. बाळासाहेब, भाऊराव हे देवरस बंधूही याच काळात बाल स्वयंसेवक या रूपात संघ शाखेच्या कामात भरपूर सक्रिय होते. बाळासाहेब देवरस यांच्या नेतृत्वाखाली ‘कुशपथक’ नावाचा मुलांचा एक विशेष गटच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी निर्माण केला होता. खुद्द डॉक्टरांच्याच सूज्ञ देखरेखीखाली विकसित होत असलेल्या संघाच्या या `प्रारंभिक वाटचालीच्या काळातच दत्ताजी शाखेत रमू लागले होते. स्वाभाविकच संघस्पर्शाचा प्रभाव त्यांच्या व्यक्तित्त्वावर कायमचा आणि खोलवर उमटला. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच संघसंस्कारही त्यांच्या व्यक्मित्त्वात फुलत गेला; इतका की पुढच्या साऱ्या आयुष्यातल्या जगण्याचा तोच एक प्रमुख घटक झाला.
सुरूवातीपासूनच दत्तात्रयची बुद्धिमत्ता आणि ग्रहणशक्ती चतुरस्र होती. घरातून, संघशाखेतून मिळणारे देशप्रेमाचे बाळकडू, स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रत्यक्ष निरीक्षण आणि अनुभव, देशभक्तीपर साहित्याचे वाचन-मनन इत्यादीतून विचारशक्तीला पैलू पडत होते. पटवर्धन हायस्कूल मधून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुणवत्तेसह यश मिळाले. १९४४ मध्ये इंटर सायन्स तर १९४७ मध्ये बी.एस.सी. ऑनर्ससह शिक्षण पूर्ण झाले. (त्यावेळी बीएस्सी ऑनर्सला आजच्या एम. एस्सीचा दर्जा होता ), गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज (सध्याची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) मधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्या दिवसात यामहाविद्यालयात साम्यवादी विद्यार्थी चळवळीचा प्रभाव होता. विद्यार्थी संघटना, आंदोलने, वैचारिक संघर्ष इ. गोष्टींची बीजे याच काळात दत्ता डिडोळकर या तरुणाच्या रोवली गेली असावीत. त्यातच अगदी बालवयापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आणि विचारसरणी यांचा वैशिष्ट्यपूर्ण संस्कार अंतरंगात रूजलेला होता. त्यामुळे शिक्षण घेता घेताच रा. स्व. संघाचेच काम पूर्णवेळ अंगिकारायचे हा विचार दृढ होत होता दरम्यान १९४० साली डॉ. हेडगेवारांचे निधन झाले. दत्तात्रय त्यावेळी सोळा-सतरा वर्षांचा होता. संघाचे काम नियोजनबद्धतेने देशभरात विस्तारत होते. शिक्षणाच्या निमित्ताने तरुण स्वयंसेवकाना देशाच्या विविध भागात पाठविण्याचा क्रम डॉक्टरानी सुरू केला होता. प्रचारक ही संज्ञा अधिकृतपणे वापरली जाऊ लागली नसली, तरी ती वृत्ती धारण केलेले अनेक तरुण दक्षिणेपासून उत्तर टोकापर्यंत (खाली मद्रास – म्हणजे आजचा तामिळनाडू तर वर थेट लाहोर मुलतान पर्यंत) संघाच्या कामाच्या विस्तारासाठी जाऊन राहिले होते. विस्ताराच्या याच क्रमात माधवराव गोळवलकर हे बनारस हिंदू विश्व विद्यालयात संघाच्या संपर्कात आले आणि त्यांची प्रतिभा, योग्यता अचूकपणे ओळखून डॉ. हेडगेवारानी त्यांना आपला वारस म्हणून जाहीर केले.
१९४० पासून सरसंघचालक पदाची सूत्रे गुरुजी (गोळवलकर) यांनी हाती घेतली आणि देशभरातल्या कार्य विस्ताराला गती देण्याच्या कामाला त्यांनी अग्रक्रम दिला. देशाच्या स्वातंत्र्याची चाहूल लागली होती, त्याचबरोबर देशाची फाळणी करण्याची मागणीही अत्यंत उग्र रूप धारण करू लागली होती. हिंदू-मुस्लीम तणाव उत्तरोत्तर गंभीर रूप घेऊ लागला होता. राज्यकर्ते ब्रिटिश अत्यंत कुटीलपणे त्या तणावाला प्रोत्साहन देत होते. देशाच्या विविध भागात हा तणाव हिंसक दंगलींच्या स्वरूपात प्रकट होऊ लागला होता. एकूण वातावरण एका बाजूने प्रक्षुब्ध तर दुसऱ्या बाजूने भारलेले होते. भविष्यवेधी दृष्टीने गुरुजी गोळवलकर या परिस्थितीचा विचार करीत होते आणि अत्यंत धीरादात्तपणे संघकार्याच्या उलगड्याला दिशा देत होते. ‘आगामी काळ देशाचे स्वातंत्र्य आणि स्वतंत्र देशाची उभारणी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे संघकार्याच्या दृढीकरणासाठी अधिकाधिक वेळ देण्याची निकड आहे’ असे आवाहन गुरुजीनी तरुण स्वयंसेवकाना उद्देशून केले. या आवाहनाला तरुणांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि देशभरात संघप्रचारकांची मोठी संख्या कार्यरत झाली.
दत्तात्रय डिडोळकर याच काळात प्रचारक बनले. १९४७ साली एम एस्सी शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच त्यांनी प्रचारक म्हणून काम सुरू करायचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती तत्कालीन मद्रास प्रांतात कालिकत येथे जिल्हा प्रचारक म्हणून करण्यात आली. आजचे केरळ आणि तमीळनाडू हे दोन्ही प्रांतांचे क्षेत्र त्यावेळच्या मद्रास प्रांतात समाविष्ट होते. संघकार्याच्या दृष्टीने हा भाग त्यावेळी अत्यंत कष्टमय होता. भाषेचा मुख्य अडसर स्थानिक बांधवांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या कामी होता. दत्ताजी तामीळ, मल्याळी भाषा शिकले आणि त्या अडथळ्यावर त्यांनी मात केली. त्यांच्या बहुभाषी पारंगततेबाबत त्यांचा पुतण्या रवी (सध्या फरीदाबाद येथे राहतो आहे.) याने गमतीदार आठवण नमूद केली आहे. तमीळ भाषा दत्ताजी इतकी सफाईने बोलत की नागपुरातल्या तामीळ भाषी संस्था त्यांना वेळोवेळी भाषण करण्यासाठी बोलवत असत. एका तमीळ गृहस्थाने त्यांचे वर्णन करताना म्हटले, “Dattaji is the only Tamilian I have seen who can speak fluent Marathi…!” दत्ताजीनी तामीळ बाराखडी पाठ केली, त्यानंतर ते जमेल तसा तामिळ लिहिण्या-बोलण्याचा सराव करू लागले आणि रोज तामीळ वृत्तपत्राचे वाचन करून त्यांनी ती भाषा अवगत केली.
मात्र दक्षिणेत गेल्यापासून वर्षभराच्या आतच देशावर महात्मा गांधीजींच्या हत्येचे संकट ओढवले. संघाच्या दृष्टीने तर हे संकट विक्राळ रूप धारण करून आले. सत्ताधाऱ्यांनी या हत्येचे किटाळ संघाच्या माथी मारण्याचा नियोजनबद्ध आणि अघोरी प्रयत्न केला. संघद्वेष आणि ब्राह्मण द्वेषाला उकळी आणण्यात आली. न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊन दोषमुक्त होण्यापूर्वीच संघ स्वयंसेवकाना अपराधी मानून त्यांच्यावर हिंसक हल्ले रचण्यात आले. महाराष्ट्रात तर गावोगाव या हल्ल्यांचे पेव फुटले. संघाची आद्यभूमी असलेले नागपूर यातून सुटणे शक्यच नव्हते. त्यातच दत्ताजींचे कुटुंब ऐन महाल भागात राहत होते. त्यांच्या घरालाही जाळपोळीची धग बसलीच. घरातले फर्निचर, पुस्तके यांची हिंसक जमावाने होळी केली. दत्ताजी मद्रासमध्येच होते, पण नित्य संघशाखांना मात्र खीळ बसली होती. संघावर बंदी घालण्यात येऊन प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली होती. सरसंघचालक गुरुजींनी अधिकृतपणे शाखा बंद केल्या होत्या. ‘युक्तिबुद्धीने सहजपणे दूर करावी जनभ्रांती, संघटनेची स्थिती पहाया रोज जमावे एकांती…’ या, संघगीताच्याच पंक्ती प्रत्यक्ष व्यवहारात अंगीकारण्याचा प्रसंग उद्भवला. संघाच्या प्रचारकांनी मात्र हा प्रसंग अत्यंत संयमाने, धैर्याने आणि कुशलतेने निभावला. संघाची शाखा बंद असली तरी अन्य मार्गांनी, विविध निमित्तांनी स्वयंसेवकांचे, विशेषतः तरुणांचे एकत्र जमणे स्थानिक स्तरावर प्रचारकांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले.
याच क्रमात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ या संघटनेची एका अस्थायी मंचाच्या स्वरूपात सुरुवात करण्यात आली. या संघटनेच्या स्थापनेत आणि प्रारंभिक जडण- घडणीत ज्येष्ठ प्रचारक आणि विचारवंत कार्यकर्ते दत्तोपंत ठेंगडी यांचा पुढाकार होता आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये दत्ताजी डिडोळकर (त्यांचे वय त्यावेळी पंचविशीचे होते) यांचा अग्रभागी समावेश होता. बंदीनंतर वर्षभरासाठी दत्ताजी नागपूरला परतले होते. विद्यार्थी परिषदेच्या नागपूर विद्यापीठ विभागाचे मंत्री या नात्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेव्हा ते (१९४८ साली) नागपूरच्या विधी महाविद्यालयात वकिलीचा अभ्यासही करू लागले होते. दत्तोपंत ठेंगडी आणि दत्ताजी डिडोळकर या दोघांमधील स्नेहसंबंधाना आणखीही काही महत्त्वाचे पैलू होते. दत्तोपंत प्रचारक म्हणून १९४२ ते १९४६ केरळमध्ये कालिकत येथे राहिले होते. त्यांच्या पाठोपाठ १९४७ साली दत्ताजी कालिकत येथेच जिल्हा प्रचारक म्हणून रूजू झाले होते. विद्यार्थी परिषदेची स्थापना हा त्यांच्या एकत्रित चिंतन आणि कार्याचा दुसरा महत्त्वपूर्ण पैलू. याबद्दलचा तपशील स्वत: दत्तोपंत ठेंगडी यांच्याच शब्दांतून समजून घेणे उद्बोधक ठरेल. दत्ताजींच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लिहिलेल्या एका विस्तृत लेखात दत्तोपंत लिहितात
. इसके पश्चात हमारे निकट संपर्क का कालावधी आया अ. भा. विद्यार्थी परिषद के प्रारंभिक दिनों में । संघ की प्रेरणा से स्वयंसेवकोंने निर्माण की हुई अखिल भारतीय स्वरूप की यह पहली ही संस्था थी । इस तरह की सार्वजनिक संस्था चलाने का अभ्यास आम तौर पर स्वयंसेवकों को नही था । यह Pioneering work था। उस समय देश में और कुछ विद्यार्थी संगठन कार्यरत थे कार्यपद्धति की दृष्टी से उनकी केवल नकल करना, इतना ही सोचा हुआ होता, तो ज्यादा कठिनाई की बात नही थी या अधिक परिश्रम और विशेष प्रतिभा की भी आवश्यकता नही थी । किंतु ऐसा विचार नही था। संघ आदर्शों- सिद्धांतों के प्रकाश में, संघ ने सीखायी हुई रीति-नीति-पद्धति को विद्यार्थी क्षेत्र में Introduce करते हुए, राष्ट्रसंवर्धन कार्य का विद्यार्थी मोर्चा इस नाते दायित्व सम्हालने वाला अपने ढंग का एक अनोखा (The only one of its type) विद्यार्थी संगठन खडा करने का यह संकल्प था। यह था Untrodden path, unchartered voyage। इसका शुभारंभ करनेवाले देश के सर्व प्रमुख pioneers में से एक थे दत्ताजी डिडोलकर… ।” विद्यार्थी परिषदेच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख कार्यकर्ते दत्ताजी होते हे, आज फारच थोड्या कार्यकर्त्याना माहीत असलेले वास्तव नमूद करण्याबरोबरच त्या प्रारंभिक दिवसांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक विकासात दत्ताजीनी निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही सविस्तर विवरण दत्तोपंत ठेंगडींनी त्यांच्या या लेखात केले आहे.
यवतमाळ येथील विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विजय दिवेकर. शिक्षणासाठी खामगाव येथे वास्तव्यास असलेले विजय (राजू) दिवेकर यांनी दत्ताजींच्या सहवासात अनुभवलेल्या क्षणांची स्मृती जागविताना म्हटले, “परिषदेच्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी दत्ताजी नियमित प्रवास करीत असत. खामगाव येथे प्रवासादरम्यान आले असता ते वास्तव्यासाठी माझ्या घरी आले होते. सहज गप्पा मारतानाही त्यांच्याकडून जे मिळत असे त्याचे मोल फार मोठे आहे. सर्वजण त्यांचा उल्लेख विद्यार्थी परिषदेचे संस्थापक असा करीत असत. स्वतः दत्ताजी मात्र विनम्रतेने सागंत, ‘मी संस्थापक वगैरे काही नाही बरं का, केवळ परिषदेच्या प्रारंभापासूनचा एक सदस्य आहे…!’ परिषदेच्या स्थापनेविषयीचा घटनाक्रम ते रंगवून सांगत – पण अलिप्त भावनेने… “विद्यार्थी क्षेत्रात काम सुरू झाले पाहिजे ही गुरुजींची (गोळवलकर) इच्छा होती. त्यावर विचार करण्यासाठी दत्तोपंत ठेंगडी, बलराज मधोक, मी आणि अन्य दोन कार्यकर्ते यांची एक बैठक झाली दिल्ली येथे. प्रदीर्घ चर्चेनंतर संघटनेचे स्वरूप आणि नावही निश्चित झाले. गुरुजींनी समाधान व्यक्त करून देशव्यापी संघटना उभी करण्यास मान्यता दिली…” हा तपशील सांगून दत्ताजी म्हणत “त्या दिवशी त्या खोलीत – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापनाही झाली आणि तिथेच आम्ही राष्ट्रीय अधिवेशनही घेऊन टाकले…” खळखळून हसत पुढे दत्ताजी म्हणाले, “पाच संस्थापक सदस्य या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित होते इतकेच नाही तर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हे अखिल भारतीय अधिवेशन असा प्रस्ताव करते की…’ अशी सुरुवात करून आम्ही तो प्रस्ताव संमतही करून टाकला….!”
परिषदेची विधीवत नोंदणी नऊ जुलै रोजी १९४९ साली दिल्ली येथे झाली. त्यादृष्टीने आवश्यक त्या घटनेची निर्मिती करण्यात दत्तोपंत, श्रीगुरूजी आणि डॉ. नागराजन यांच्या मदतीने दत्ताजीनी पुढाकार घेतला. केवळ ‘युनियन’ स्वरूप संघटना नव्हे तर विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातल्या अन्य घटकांच्या समन्वित व्यवहारातून संस्कारित छात्रशक्ती राष्ट्रीय कार्यात संयोजित करणारा संघटन व्यवहार साकार करण्याचा संकल्प या घटनेतून व्यक्त केला गेला आहे. डॉ. नागराजन हे दत्ताजींचे सहकारी राहिले. प्रचारकी कालावधीच्या अगदी सुरुवातीच्या दिवसात कोईमतूर येथेही आणि पुढे नागपुरात विद्यार्थी परिषदेच्या कामातही.
स्थापनेच्या वेळचे परिषदेचे पहिले अखिल भारतीय अध्यक्ष होते ओमप्रकाश बहल, तर महामंत्री होते वेदप्रकाश नंदा. संघटनेच्या विस्ताराचा विचार करायचा तर भारतातल्या काही प्रमुख शहरांपुरताच तो मर्यादित होता. त्या शहरातल्या एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यावरच संबंधित प्रदेशात कार्यविस्तार आणि कार्याचे स्थैर्य निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. केंद्रीय स्तरावरून नियोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचे आपापल्या स्थानी क्रियान्वयन करणे आणि संघटनेची प्रादेशिक शाखा सर्व बाबतीत स्वयंपूर्णतेने उभी रहावी यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करणे ही प्रदेश स्तरावर जबाबदारी निभावणाऱ्या कार्यकर्त्यांची अपेक्षित भूमिका होती. विदर्भात ही भूमिका दत्ताजी डिडोळकर यांनी अतिशय समर्थपणे निभावली.
संघटनेची सदस्यता वाढविणे, विविध स्तरांवर संघटनेच्या समित्या स्थापन करणे, विद्यार्थी समूह, प्राध्यापक वर्ग, प्राचार्य, विद्यापीठाचे अधिकारी, कुलगुरू, अन्य विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक क्षेत्रातले प्रमुख नेते. … अशा सर्व स्तरात व्यक्तीगत संपर्क निर्माण करण्याचे काम दत्ताजीनी अतिशय कुशलतेने केले. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांची संबंधित सर्व घटकांच्या समन्वयातून उकल करणे, विद्यार्थी वर्गात राष्ट्रभावनेचे जागरण घडविणारे विविध कार्यक्रम-उपक्रम घडवून आणणे इत्यादीच्या आयोजनाचा आदर्श वस्तुपाठ दत्ताजीनी आपल्या कार्यशैलीतून घालून दिला. विधी महाविद्यालयात अभ्यासक्रमाचे आणि नित्य अध्यापनाचे योग्य वेळापत्रक (टाईम टेबल) तयार व्हावे यासाठी केलेले आंदोलन, निवासी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (Medical – RMP) विद्यार्थ्यांचे ‘पदवी’ला दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी झालेले आंदोलन तसेच स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे उपोषण यासारखी अनेक आंदोलने त्यांनी यशस्वी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्नांपासून देशासमोरील मोठ्या, राष्ट्रीय समस्यांपर्यंत जनजागृती घडवून आणण्यात आणि विद्यार्थीवर्गाची संघटीत शक्ती त्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या कामी संयोजित करण्यात पुढाकार ही अ. भा. विद्यार्थी परिषदेची आता ओळखच बनली आहे. संघटनेचे हे चरित्र निर्माण करण्याची दीर्घदृष्टी दत्ताजींनी त्या प्रारंभिक काळातच अंगीकारली होती. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाच्या सर्व क्षेत्रातील व्यवस्थांची रचना करताना निव्वळ भारतीय दृष्टिकोन अंगीकारण्याचा आग्रह पुरस्कारणाऱ्या ‘भारतीयकरण – उद्योग’ नावाच्या अभियानाचे आयोजन परिषदेने केले. या अभियानासाठी दत्ताजींनी विदर्भ क्षेत्राचा विस्तृत दौरा केला. याच काळात ‘अधिक धान्य पिकवा’ (Grow More Food) या कृषिविकासाच्या राष्ट्रीय अभियानातही परिषदेने सक्रिय सहभाग घेतला होता. दत्ताजींच्या कल्पक नेतृत्वाखाली गुमथळा आणि फेटरी या दोन खेडेगावांमध्ये परिषद कार्यकर्त्यांनी कंपोस्ट खताचे खड्डे खोदण्याचे काम गावकऱ्यांना सोबत घेऊन केले. या स्वयंस्फूर्त रचनात्मक कामाची सरकारी पातळीवर गौरवाने दखल घेतली गेली. आर. आर. दिवाकर नावाच्या केंद्रीय मंत्री महोदयांनी नागपूरच्या दौऱ्यात या कामांची पाहणी केली आणि त्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची जाहीर स्तुती केली. सरकारने या कामाची एक लघुचित्रफीत (Documentary) बनवून ती प्रसारितही केली होती. आंदोलनात्मक कार्यक्रमाबरोबर रचनात्मक कामांचा आग्रह संघटनेच्या वैचारिक भूमिकेत, कार्यपद्धतीत आणि त्याद्वारे विद्यार्थी समूहात निर्माण करण्याला अशी अगदी सुरुवातीपासूनच चालना दिली गेली. नागपूरजवळच्या कन्हान नदीला पूर आला तेव्हा किनारी भागातील पूरग्रस्त गावांमध्ये पूरपीडित बांधवांच्या मदतकार्यातही दत्ताजींनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याना संयोजित केले. कपडे, औषधे, अन्य वैद्यकीय साहाय्य पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्याच्या कामी परिषद कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
१९५० सालच्या विद्यापीठीय परीक्षांपूर्वी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन मिळवून देण्याचा एक अभिनव कार्यक्रम दत्ताजीनी आयोजित केला. पुढे चौदा वर्षांनी त्यांनी नागपुरात जो व्यवसाय अत्यंत प्रतिष्ठित स्वरूपात चालविला त्याचाच हा जणू पूर्वावतार होता. नागपूरच्या वेगवेगळ्या महाविद्यालयात कलाशाखेतील विविध विषय शिकविणाऱ्या ख्यातनाम प्राध्यापकांच्या मार्गदर्शन भाषणांची एक मालिका (Lecture series) त्यांनी चालविली. हेतु हा की सर्व विद्वान आणि कुशल प्राध्यापकांचे मार्गदर्शन सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना एकत्रितपणे उपलब्ध व्हावे. महाल भागातल्या सिटी कॉलेजचे प्राचार्य पांढरीपांडे यांनी या व्याख्यान मालिकेसाठी त्यांच्या महाविद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली होती. व्याख्यानमालेमध्ये एकूण ६४ व्याख्याने आयोजित करण्यात आली. या उपक्रमाची. नागपुरात सर्वत्र मुक्तपणाने वाखाणणी होणे स्वाभाविक होते. अगदीच शैशवावस्थेत असलेल्या विद्यार्थी परिषदेला यामुळे व्यापक स्तरावर मान्यता मिळणेही स्वाभाविक होते. परिषदेचे काम हा निव्वळ पोरासोरांचा, शिळोप्याच्या वेळी सामाजिक काम करण्याचा वरवरचा उपक्रम नव्हे तर अतिशय गंभीरपणे चालविले जाणारे एक सामाजिक आंदोलन आहे याची खूणगाठ अशी पहिल्या एक दोन वर्षातच बांधली गेली आणि त्यामागे होते दत्ताजी डिडोळकर यांचे कुशल, धुरंधर नेतृत्व.
परिषदेला अशी मान्यता मिळाल्याचा सार्वजनिक परिणाम अत्यंत महत्त्वाचा होता आणि दत्ताजीनी तो परिणामही संघटनेत सामावून घेण्याची दृष्टी बाळगली.
संघ विचारांच्या किंवा हिंदुत्ववादी विचारवंत आणि मान्यवर व्यक्ती तर अत्यंत उत्सुकतेने आणि आत्मीयतेने परिषदेच्या मंचावर येणे स्वाभाविक होतेच. मात्र दत्ताजींनी त्या वर्तुळाच्या बाहेरच्या अनेक मान्यवरांना परिषदेच्या कार्यक्रमात उपस्थित केले. अशा मान्यवरांची काही नावे पाहिली तरी दत्ताजींचे संपर्क-कौशल्य ठळकपणे ध्यानात येते. मध्यभारत प्रदेशाचे राज्यपाल मंगलदास पकवासा, मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला, गृहमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा, अर्थमंत्री दुर्गाशंकर मेहता, अन्नमंत्री गोपाळराव काळे, केंद्रीय मंत्री आर. आर. दिवाकर… एवढेच काय, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन यांचाही विद्यार्थी परिषदेच्या नागपूर येथील कार्यकर्त्यांशी अनौपचारिक वार्तालाप दत्ताजींनी घडवून आणला होता.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी विनाशर्त उठली. सर्व प्रकारच्या तपासण्या न्यायालयीन प्रक्रियांमधून गांधीजींच्या हत्येशी संघाचा काहीही संबंध नसल्याचा निष्कर्ष जाहीर झाला. संघाचे काम पूर्ववत सुरू झाले. दत्ताजीही आपल्या मूळ कार्यक्षेत्रात- दक्षिण भारतात परतले. आता त्यांच्यावर सेलम, मदुराई आणि त्रिवेंद्रम (आताचे तिरूवनंतपुरम्) या तीन जिल्ह्यांचे प्रचारक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. बंदीकाळात झालेली संघकार्याची पिछेहाट भरून काढणे, गांधी हत्येच्या आरोपामुळे समाजाच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आणि स्वयंसेवकांचे खचलेले नीतिधैर्य पुनर्प्रस्थापित करणे अशा कामाकडे सारे संघ प्रचारक अग्रेसर झाले. दत्ताजींचा अ. भा. विद्यार्थी परिषदेतील सहभागाचा अध्याय तूर्त स्थगित झाला, अर्थात संपला मात्र नाही. दहा-बारा वर्षांनंतर तो पुन्हा सुरू व्हायचा होता.
१९५४ साली दत्ताजींवर मद्रास प्रांताचे प्रचारक अशी जबाबदारी सोपविण्यात आली. याआधीच नमूद केल्याप्रमाणे आजचा केरळ आणि तामीळनाडू अशा दोन प्रदेशांच्या क्षेत्राचा समावेश मद्रास प्रांतात होता. १९५४ ते १९६४ अशी एकूण दहा वर्षे दत्ताजी मद्रास प्रांताचे प्रांत प्रचारक राहिले. या काळात केरळ – तामीळनाडूमध्ये संघ कामाचे बीजारोपण तर दत्ताजींनी केलेच पण या दोन्ही राज्यांच्या कानाकोपऱ्यात कार्याचा विस्तारही त्यांनी घडवून आणला. हे काम १९५० च्या दशकात अत्यंत जटिल होते. महात्माजींच्या खुनाच्या धादांत खोट्या आरोपाचे किटाळ आणि त्या निमित्ताने संघाची यथेच्छ बदनामी करण्याचा अतिशय घृणास्पद उपक्रम सरकारी स्तरावरून राबविला गेला. न्यायालयीन प्रक्रियेतून संघ संपूर्ण निर्दोष सिद्ध झाला खरा, पण दरम्यानच्या बदनामी अभियानाने आणि बंदीमुळे प्रतिमेची आणि संघटनेची हानी झाली होतीच. त्या पार्श्वभूमीवर तामीळनाडू, केरळच्या क्षेत्रात संघकार्य करणे ही खडतर बाब बनली होती. अशा स्थितीत दत्ताजींनी तेथे केलेल्या परिश्रमाचे वर्णन एन. मूर्ती (उलनपाडू), कल्लदा शिवशंकर (कोल्लम – केरळ), सी. गोपालन् (चेन्नई), बी. व्ही. श्रीनिवासराव (त्रिची – तामीळनाडू), शशीधरन नायर इत्यादी अनेक सहकाऱ्यांनी केले आहे. . एक अत्यंत दुर्मीळ आणि बहुआयामी व्यक्तित्व दत्तार्जीना लाभले होते. कोणालाही मोहून टाकण्याची अपूर्व क्षमता त्यांच्यात होती; परंतु स्वत:ची प्रतिमा उंचावण्याची इच्छा मात्र अजिबात नव्हती. व्यक्तीला सर्व प्रकारे सांभाळणारा बिनदोरीचा लगामच जणू त्यांच्याकडे होता. संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहजपणे ‘संघटनधर्म’ शिकवत असत. तसेच सर्व प्रकारच्या प्रसंगांमध्ये त्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहत. अशा कित्येकांना त्यांनी सतत कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली, आवश्यक तेव्हा वृक्षाची सावली प्रदान केली आणि त्या सावलीखाली काही काळ विसावा घेतल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरित केले…..”
एकान्तिक ध्येयनिष्ठा, संपूर्ण समर्पण आणि ‘माणूस’ या घटकाविषयीची पराकोटीची आस्था या गुणांमुळे तरुण वयातच दत्ताजी डिडोळकर यांना अनेक स्वयं सेवकांच्या लेखी पितृतुल्य स्थान प्राप्त झाले. कोणाच्या मते दक्षिणेतील संघकार्याची पायाभरणी हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम, तर कोणी विवेकानंद स्मारकाच्या उभारणीचे त्यांनी केलेले बीजारोपण हे त्यांचे सर्वश्रेष्ठ योगदान मानतो. मात्र स्मारक असो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असो वा संघाचे काम. कार्यकर्त्याची त्यांनी केलेली सहज सुंदर जडणघडण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य सर्वच क्षेत्रांतील त्यांच्या कर्तृत्वाला व्यापून राहिले. त्यांचे घनिष्ट सहकारी आणि पुढे संघाचे तिसरे सरसंघचालक झालेले बाळासाहेब देवरस यांनी दत्ताजींच्या संघकार्यातील योगदानाबद्दल धन्योद्गार काढताना म्हटले, . ऐसे कठि … क्षेत्रमें भी दत्ताजी ने संघकार्य का बीजारोपण किया और कार्यकर्ताओं की एक पलट खड़ी की । प्रदेश के हर कोने में शाखाएँ स्थापित की और संघकार्य की सफल उडान लिये अनुकूल वातावरण निर्माण किया । आज केरल प्रांत में संघ की जो प्रतिष्ठा है औ तामिळनाडू में भी शासन को तथा जनता को संघ का प्रभाव दीख पडने लगा है, उसक श्रेय दत्ताजी ने डाली हुई नींव को ही है ।”